सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:36 PM2019-07-01T13:36:14+5:302019-07-01T13:38:04+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पांडुरंग काळे, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पांडुरंग काळे, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
शासनाच्या अनुदानित, विनाअनुदानित, खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याबाबत धरसोडीच्या अवलंबिलेल्या शैक्षणिक धोरणाविरोधात तसेच शिक्षक, विद्यार्थीविरोधी भूमिकेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र नाराजी व असंतोष वाढला आहे. शासनाच्या या शिक्षक व विद्यार्थीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी तसेच विविध योजनांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, टप्प्याटप्प्याने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा, तुकड्या, शिक्षक मान्यतेच्या दिनांकापासून व नियुक्तीपासून निश्चित कराव्या व पुढील टप्पे विनाअट मंजूर करावेत. सर्व अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हांतर्गत समायोजन करावे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध लागू करावा, रिक्त पदे त्वरित भरावीत, दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात काम करणाऱ्या सर्व घटकांच्या मानधनात वाढ करावी, अनुकंपा भरती तत्काळ करावी, या मागण्या करण्यात आल्या.