सिंधुदुर्ग जिल्ह्यात११ आरोग्य केंद्रांना डॉक्टरच नाही,आरोग्य समिती सभेत उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:34 PM2018-08-11T14:34:46+5:302018-08-11T14:40:35+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ग्रामीण भागात आरोग्याची गंभीर समस्या भेडसावत असतानाच जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी तब्बल ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही डॉक्टर नसल्याची बाब आरोग्य समिती सभेत उघड झाली. या ११ आरोग्य केंद्रांची आरोग्य सेवा रामभरोसे असून तेथील रुग्णांचे हाल होत आहेत याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ग्रामीण भागात आरोग्याची गंभीर समस्या भेडसावत असतानाच जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी तब्बल ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही डॉक्टर नसल्याची बाब आरोग्य समिती सभेत उघड झाली. या ११ आरोग्य केंद्रांची आरोग्य सेवा रामभरोसे असून तेथील रुग्णांचे हाल होत आहेत याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली.
जिल्ह्यात सध्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असतानाच रेडी व आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने ही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या मुद्यावर सभेत चर्चा झाली.
यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी तब्बल ११ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरच नसल्याचे आरोग्य अधिकारी खलिपे यांनी सांगितले. मात्र, या ११ ठिकाणची आरोग्य सेवा रामभरोसे असून तेथील रुग्णांचे हाल होत आहेत.
त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली. तर आपल्याला आयुषअंतर्गत प्रथम २० बी.ए.एम.एस. डॉक्टर मिळाले असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्याठिकाणी नियुक्त केले जातील असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सभागृहात स्पष्ट केले. दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना अर्थसहाय्य करणे योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत १५ हजार रुपये अनुदान दिले जाते.
या योजनेचे ५७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सुमारे ८ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या ५७ जणांना १४ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते धनादेश वाटप केले जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.