सिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 11:08 AM2021-06-21T11:08:11+5:302021-06-21T11:10:29+5:30
Corona virus uday Samant Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या घटत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली करण्यास मुभा देण्यात येणार आहे, तसेच जिल्ह्यात काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी सामाजिक अंतरसह शासकीय नियमांचे पालन केल्यास ८ ते १० दिवसांत जिल्हा दुसऱ्या टप्प्यात येईल, अशी आशाही व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. हा रेट २७ वरून ९ टक्क्यांच्या आत आला आहे. जिल्ह्यात सध्या एकूण उपलब्ध खाटांच्या ५५.२० टक्के खाटा (बेड) रिक्त आहेत.
जिल्हा ब्रेक द चेनच्या चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांसह अन्य आस्थापना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद
अत्यावश्यक सेवा मात्र सर्व दिवस सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेलही सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के आसन क्षमतेने सुरू, तर सायंकाळी ४ वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाणार असून, त्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही.
सलून, ब्युटीपार्लरही सुरू होणार आहेत. सर्व दुकानांना ही शिथिलता दिली असली तरी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने सायंकाळी ४ वाजता पूर्णतः बंद करणे बंधनकारक असून, तसे न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसार
जिल्ह्यात कोरोनामध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देत सर्व दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. हा निर्णय शासनाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी कोणी दबाव आणला त्यामुळे घेतला असे नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.