सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे, श्रीकृष्णाची गवळदेवांच्या स्नेहभोजनाची पारंपरिक प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:57 PM2017-11-17T14:57:54+5:302017-11-17T15:31:45+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीची लगबग संपली आहे. आता वेध लागले आहेत ते सार्वजनिक माळरानावरील गवळदेवांच्या स्नेहभोजनाचे. जिल्ह्यात ही प्रथा अजूनही खेडोपोडी, गावोगावी सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने गुराखी आपली गाई, वासरे माळरानावर घेऊन जातात. श्रीकृष्णाने गुराख्यांना एकत्र करून रानातल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू केला, तो म्हणजे गवळदेव होय.
विनोद परब
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीची लगबग संपली आहे. आता वेध लागले आहेत ते सार्वजनिक माळरानावरील गवळदेवांच्या स्नेहभोजनाचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रथा अजूनही खेडोपोडी, गावोगावी सुरू आहे. ग्रामस्थांच्या मदतीने गुराखी आपली गाई, वासरे माळरानावर घेऊन जातात. श्रीकृष्णाने गुराख्यांना एकत्र करून रानातल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू केला, तो म्हणजे गवळदेव होय.
दरम्यान, कोकणातील भातकापणीची कामे संपली की, या गवळदेवाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. तुळशी विवाह समारंभ पार पडला की, शनिवार किंवा रविवार असा एक दिवस ठरविला जातो व वाडीतल्या बाळगोपाळांना एकत्र जमवून रानातील गवळदेवाची पूजा-अर्चा केली जाते. हाच गवळदेव कार्यक्रम होय.
पूर्वी जंगलात वाघांचा तसेच अन्य रानटी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असायचा. यावेळी गाई व वासरे वाघांच्या डरकाळीला घाबरून जायची. अशावेळी जंगलात वावरताना गुराख्यांना दक्ष रहावे लागत असे. एकेकट्या गुराख्याला या रानटी प्राण्यांपासून आपल्या गाई-वासरांची सुटका करता येत नसे.
त्यामुळे त्यांच्यापासून अभय मिळावा म्हणून गुराखी एका ठिकाणी माळरानावर जमायचे व एकत्र वावरायचे. त्यावेळी गाई-वासरेही एकत्र असायची. एका मोठ्या झाडाच्या सावलीत ही गाई-वासरे व गुराखी थांबायचे. तेथेच सर्व गुराखी एकत्र जमून आपण आणलेली भाजी-भाकरी खायचे.
हीच प्रथा पुढे हळूहळू चालू राहिली. त्यानंतर शेतकरी आपल्या गुरांसोबत जमून रानात जेवण बनवायला शिकले. तेथेच चुलीवर जेवण करायचे व गाई-वासरांसोबत दिवस घालवायचे व रानटी प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करायचे.
माळरानावरील एका ठिकाणी जमून गुराखी झाडाखालील दगडांची साफसफाई करीत. त्यानंतर तुळशी वृंदावने उभारून या गवळदेवाची पूजा केली जायची. गुराखी गवळदेवाकडे साकडे घालायचे. प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवायचे व केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणासाठी सर्वांना आमंत्रण करायचे. त्यावेळी गुराखी आपल्याकडे असणारे गाईचे दूध, दही आदी पदार्थ नैवेद्य म्हणून आणायचे.
हीच प्रथा पुढे चालू राहिली. आता माळरानावरील गवळदेवाच्या ठिकाणी सर्वजण जमून चुलीवर भात, भोपळ््याची भाजी, डाळ, वडे आदी पदार्थ शिजविले जातात. गवळदेवाची पूजाअर्चा करून, नैवेद्य दाखवून एकत्र बसून भोजन केले जाते.
वाघोबाची शांती
या जेवणाच्या कार्यक्रमानंतर रात्री भजन, कीर्तन कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी शिळा गवळदेव व वाघोबाची वाडी असे कार्यक्रम होतात. यात जंगलातील वाघाला शांत करण्यासाठी त्याच्या नावाने एक वाडी (नैवेद्य) काढून ठेवण्याची प्रथा आहे.
मात्र, सध्याच्या परिस्थितीत एखाद्या गुराख्याला वाघ बनवून त्याच्या तोंडात वडे ठेवले जातात व गवळदेवाच्या पाराला प्रदक्षिणा मारून त्याने पाण्यात उडी मारायची अशी पद्धत आहे. ही पद्धत अशीच पुढे चालू ठेवली असल्यामुळे येणाऱ्या पुढील काही वर्षांत अशीच गवळदेवाची परंपरा सुरू राहणार आहे. श्रीकृष्णाने सुरू केलेली ही पारंपरिक पद्धत अजूनही सुरू असून यापुढेही अशीच चालू राहणार आहे.