सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळणार 'महाविकास आघाडी' पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:05 PM2019-12-09T12:05:34+5:302019-12-09T12:06:23+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडी' फॉर्म्युला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत व आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादानंतर दोन्ही पक्षांनी वेगळा पर्याय निवडण्याचे ठरवले. त्यांनतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यातंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडी' फॉर्म्युला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत व आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कुडाळ तालुक्यातील आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार जान्हवी सावंत यांचा एकदिलाने प्रचार करणार आहेत. त्यामुळे सावंत यांचा विजय होईल, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शनिवारी कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिपद पार पडली. यावेळी आमदार नाईक म्हणाले, राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. या सर्व पक्षांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केले आहे. ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्याने आता कोकणचा पर्यायाने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झपाट्याने होणार आहे.
तसेच ठाकरे यांचे कोकणाकडे जास्त लक्ष आहे. शिवसेनेने कोकणाला आणि कोकणवासीयांनीही शिवसेनेला भरभरून दिले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. या दोन्ही पक्षांसह आरपीआयचेही सहकार्य आहे. १२ डिसेंबरला होणाऱ्या या पोटनिवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सावंत यांच्या विजयासाठी जोमाने प्रचार करणार आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.