लोकसभा निवडणुकीत एसटी'चा सिंधुदुर्ग विभाग मालामाल; किती लाखाचे उत्पन्न मिळाले.. जाणून घ्या
By सुधीर राणे | Published: May 13, 2024 05:41 PM2024-05-13T17:41:14+5:302024-05-13T17:43:51+5:30
आगारांमधून १२० बस व १७ मालवाहक ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती
कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले. मतदान पथकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत ६ मे रोजी नेवून सोडणे व ७ मे रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगारांमधून १२० बस व १७ मालवाहक ट्रकची व्यवस्था करण्यात आली होती. तर मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी १० मालवाहक ट्रकचा वापर करण्यात आला होता.
या सर्वगाड्यांच्या भाड्यापोटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला शासनाकडून सुमारे ४९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.त्यामुळे एसटीचा हा विभाग एकप्रकारे मालामाल झाला आहे.
बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य ने-आण करणे, यासह कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच साहित्य वाहतुकीसाठी मालवाहू ट्रकचा वापरही करण्यात आला होता. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी १२० बस व १० मालवाहू ट्रक ६ आणि ७ मे रोजी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.त्यामुळे दोन दिवस जिल्हांतर्गत वाहतूक काहीशी प्रभावित झाली होती.
मतदानासाठी दोन दिवस १२० बसची सेवा!
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले. मतदान कर्तव्यासाठी ६ व ७ मे रोजी महामंडळाच्या १२० बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे महामंडळाला चांगले उत्पन्न मिळाले आहे.महामंडळाच्या उर्जितावस्थेसाठी असे विविध उपक्रम फलदायी ठरत आहेत यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण दौऱ्यावर आले होते.त्यावेळीही महामंडळाच्या बस लोकांना ने-आण करण्यासाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या.त्यामुळेही चांगले उत्पन्न मिळाले होते.