सिंधुुदुर्ग : कणकवली पंचायत समिती सभेत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरना धरले धारेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:23 PM2018-10-26T17:23:08+5:302018-10-26T17:26:17+5:30
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका साडेतीन महिने बंद आहे. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका साडेतीन महिने बंद आहे. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
रुग्णांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. तर लेप्टो , डेंग्यूची चाचणी करण्यासाठी कीटच उपलब्ध नाही. याला जबाबदार कोण ? असा हलगर्जिपणा करु नका . रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करा. असे सांगत पंचायत समिती सदस्यानी मासिक सभेत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरना धारेवर धरले. त्यामुळे काही वेळ सभेतील वातावरण तंग झाले होते.
या मुद्याविषयी उत्तर देताना डॉ. सतीश टाक यांनी उपलब्ध मनुष्य बळाचा पुरेपूर वापर करून सेवा देण्यात येत आहेत. रुग्णांची परवड होणार नाही याकड़े आमचे लक्ष आहे,असे यावेळी सांगितले. कणकवली पंचायत समितीची मासिक सभा परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात सभापती दिलीप तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली . यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते.
यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता तसेच इतर सेवे विषयीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. मिलिंद मेस्त्री तसेच गणेश तांबे यानी हा मुद्दा उपस्थित केला होता. कंत्राटी स्वच्छता कामगार नसले तरीही ३ सफाई कामगारांकडून ३ शिफ्टमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील साफसफाई केली जात असल्याचे स्पष्टीकरण डॉ. सतीश टाक यांनी दिले.
डेंग्यू, लेप्टो चाचणी किटची मागणी जिल्हास्तरावर केली आहे. त्यांनी स्थानिक स्तरावर ते खरेदी करावे असे कळविले आहे. मात्र रुग्ण कल्याण समितीची मंजूरी घ्यायची असल्याने खरेदी केलेली नसल्याचे सांगितले. तर औषधे व इतर साहित्य तत्काळ खरेदी करा . मंजूरी नंतर देता येईल. त्यासाठी थांबू नका असे गटविकास अधिकारी मनोज भोसले यानी डॉक्टरना सांगितले.
108 रुग्णवाहिका आपल्याकडे उपलब्ध असते . तसेच आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णवाहिका रुग्णांना उपलब्ध करून दिली जाते. तीचे भाड़े आम्ही देतो. असेही डॉ. टाक यानी रुग्णवाहिकेच्या मुद्यावर बोलताना सांगितले.
त्यानंतर आढावा बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा प्रश्न चर्चेत आला. शिक्षण विभागातील ४ विस्तार अधिकारी पुढील तारखांच्या फिरती दाखवून कार्यालयात नसल्याचे काही कालावधी पूर्वी उघड झाले होते.त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली? असा प्रश्न गणेश तांबे , मिलिंद मेस्त्री यांनी विचारला. तर त्याना नोटिस देण्यात आली असून त्यांनी खुलासा केला असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित विस्तार अधिकाऱ्यांनी असमाधानकारक खुलासा केला असून त्याला गणेश तांबे यांनी आक्षेप घेतला.
तसेच त्या चारही अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली ?असा प्रश्न गटविकास अधिकाऱ्यांना विचारला. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना ते पाठीशी का घालताहेत ?
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या खोट्या फिरतीबाबत पंचायत समिती सदस्यांच्या हरकतीची नोंद इतिवृत्तात का नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. गणेश तांबे यांच्या प्रश्नांसमोर प्रभारी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले निरुत्तर झाले.
कलमठमध्ये स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळून आल्यानंतर आणि रुग्ण दगावल्यानंतरही त्या गावाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वैद्यकीय अधिकारी अथवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट का दिली नाही ? असे मिलिंद मेस्त्री यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांना विचारले.
स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णाचा मृत्यू होऊनही वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत नाहीत.वैद्यकीय अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नाही काय ? असे विचारत सभापती दिलीप तळेकर यांनीही डॉ. मिठारी यांच्यावर ताशेरे ओढले.मात्र, आरोग्य विभागाने संबधित भागाचा सर्व्हे केला असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे डॉ. कुबेर मिठारी यांनी यावेळी सांगितले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या भात शेती नुकसानीचा सर्व्हे करून कृषि विभागाने तत्काळ अहवाल द्यावा. तसेच त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी.अशी मागणी मिलिद मेस्त्री , प्रकाश पारकर, मंगेश सावंत , सुजाता हळदिवे या सदस्यानी केली.
या सभेत बंधाऱ्यांची दुरुस्ती , जुन्या बंधाऱ्यांचे निर्लेखन करून नवीन बंधारे बांधणे, शौचालय बांधण्यासाठी अनुदान देणे, महामार्ग चौपदरिकरण , नवीन एस.टी. गाड्या सुरु करणे, शिवशाही गाड़यांची सेवा सुधारणे अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेच्या सुरुवातीला माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांचा त्यांनी सभापती पदाच्या कालावधीत केलेल्या चांगल्या कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला.
अधिकारी अनुपस्थित असल्याने नाराजी !
एस. टी. तसेच विज महावितरणचे अधिकारी या मासिक सभेला अनुपस्थित असल्याने पंचायत समिती सदस्यानी नाराजी व्यक्त केली. तसेच अधिकारीच जर सभेत उपस्थित नसतील तर आम्ही जनतेच्या समस्या कोणाला विचारायच्या ?असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.