सिंधुदुर्ग : गटारे साफ न केल्यामुळे पाणी रस्त्यावर : ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 05:50 PM2018-07-26T17:50:22+5:302018-07-26T17:53:38+5:30
भुईबावडा बाजारपेठेतील दत्तमंदिरानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या गटारांची साफसफाई केलेली नसल्याने आयुर्वेदिक दवाखान्यापासून गटाराचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
वैभववाडी : भुईबावडा बाजारपेठेतील दत्तमंदिरानजीक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या गटारांची साफसफाई केलेली नसल्याने आयुर्वेदिक दवाखान्यापासून गटाराचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
खारेपाटण-गगनबावडा मार्गाच्या दुतर्फा वसलेली भुईबावडा बाजारपेठ ही दशक्रोशीतील महत्त्वाची बाजारपेठ आहे. याठिकाणी बँका, वैद्यकीय, शैक्षणिक व अन्य सुविधा असल्यामुळे दशक्रोशीतील ग्रामस्थांची या बाजारपेठेत सतत रहदारी असते. याशिवाय हा राज्य मार्ग असल्यामुळे वाहनांचीही सतत वर्दळ बऱ्यापैकी असते. त्यामुळे बाजारपेठेतील मोठमोठ्या खड्ड्यांचा सर्वांना त्रास होत आहे.
गेल्या वर्षी बाजारपेठेतील खड्ड्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु, ती मलमपट्टी तकलादू असल्याने पावसात पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत तर भुईबावडा ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याबाबत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग भुईबावडा बाजारपेठेतील खड्डे बुजविण्याचा कधी निर्णय घेते याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
चालकांची कसरत
दत्त मंदिरानजीक रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दुचाकीस्वार, रिक्षा व छोट्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांतून वाहन चालविताना चालकांना तसेच नागरिकांनाही जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. बाजारपेठेतून शाळकरी मुले, वयोवृद्ध व आजारी नागरिक ये-जा करीत असतात. त्यांना खड्ड्यातील चिखलाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे.