सिंधुदुर्ग : कणकवलीत गटार तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर, उपाययोजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 04:04 PM2018-06-08T16:04:38+5:302018-06-08T16:04:38+5:30
कणकवली प्रांत कार्यालय ते हुन्नरे घरापर्यंत जाणारे गटार कचरा, माती साठून तुंबल्याने या गटारातील पाणी मुंबई-गोवा महामार्गावर तसेच प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्ड्यात हे पाणी साठून रहात आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. यामुळे हे गटार तत्काळ साफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कणकवली : कणकवली प्रांत कार्यालय ते हुन्नरे घरापर्यंत जाणारे गटार कचरा, माती साठून तुंबल्याने या गटारातील पाणी मुंबई-गोवा महामार्गावर तसेच प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्ड्यात हे पाणी साठून रहात आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. यामुळे हे गटार तत्काळ साफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून या प्रभागातील नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी गुरुवारी याठिकाणची पहाणी केली. कणकवली नगरपंचायतीकडून गटार सफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र ही मोहीम पूर्ण न झाल्याने काही ठिकाणी गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत.
शहरातील सर्वच ठिकाणचे सफाईचे काम न झाल्याने लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हांला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडून हे काम न झाल्यास आपल्या स्तरावर हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे नगरसेवक नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे आता नगरपंचायतीने हे तुंबलेले गटार साफ करून सांडपाण्याचा निचरा करणे महत्त्वाचे बनले आहे. अन्यथा या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढेल. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. या सांडपाण्यामुळे प्रांत कार्यालय प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून त्यातूनच नागरिकांना मार्ग काढत जावे लागत आहे.
दंडात्मक कारवाई करणार
दरम्यान, ज्या ठिकाणाहून हे सांडपाणी वाहून येते त्या संबंधित मालकाला नगरपंचायतीकडून या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणी सांडपाणी जाण्यासाठी असलेले गटार कचरा व मातीने तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे संबंधित मालक व नगरसेवकांचे म्हणणे आहे.