सिंधुदुर्ग : कुडाळातील आरोग्य कर्मचाऱ्याची आत्महत्या,आत्महत्येचे कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:36 PM2018-06-26T17:36:47+5:302018-06-26T17:37:13+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व कुडाळ बाजारपेठ येथील रहिवासी यशवंत उर्फ सचिन गोविंद शिरसाट (३५) यांनी रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची कुडाळ पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी व कुडाळ बाजारपेठ येथील रहिवासी यशवंत उर्फ सचिन गोविंद शिरसाट (३५) यांनी रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची कुडाळ पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
शिरसाट यांचे कुडाळ बाजारपेठेतील समादेवी मांड येथे घर असून, ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात चालक या पदावर कार्यरत होते. गेल्या काही कालावधीपासून ते जिल्हा परिषद शिक्षण सभापती यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते.
रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर ते घराच्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेले होते.
सकाळी उशिरापर्यंत ते उठले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना उठविण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजाला आतून कडी होती. खोलीचा दरवाजा ठोठावूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला असता शिरसाट यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावल्याचे दिसून आले.
कुडाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यशवंत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, बहीण, भावोजी असा परिवार आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.