सिंधुदुर्ग : रात्रीच्यावेळी रस्त्याचे चोरीछुपे काम, वझरे गावातील प्रकार, शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:48 PM2018-02-17T18:48:31+5:302018-02-17T18:57:03+5:30
वझरे येथे होत असलेल्या खडी क्रशर प्लान्टसाठीची यंत्रसामुग्री नेण्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीतून रात्रीच्यावेळी चोरीछुपे खोदण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम शुक्रवारी शेतकऱ्यांनी रोखले. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
दोडामार्ग : वझरे येथे होत असलेल्या खडी क्रशर प्लान्टसाठीची यंत्रसामुग्री नेण्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीतून रात्रीच्यावेळी चोरीछुपे खोदण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम शुक्रवारी शेतकऱ्यांनी रोखले. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे दोडामार्ग तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे.
वझरे येथे एक खासगी कंपनी खडी क्रशर प्लान्ट उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जमीनही खरेदी करण्यात आली आहे. मात्र, हा प्लान्ट उभारण्यासाठी यंत्रसामग्री ट्रेलरद्वारे नेण्याकरिता रस्ता नाही. गावातील रस्ता हा अरूंद आहे. शिवाय अवजड मालाची वाहतूक करण्यास गावकऱ्यांची हरकत असल्याने वझरे गावच्या वेशीवरून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता काढण्याचे काम सुरू आहे.
काही जमीनमालकांना रस्त्याचा मोबदला देण्यात आला आहे. तर काहींचा स्वत:च्या जमिनीतून रस्ता देण्यास पूर्ण विरोध आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी चोरीछुपे रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना समजताच रस्ता काढण्यासाठी आणण्यात आलेला जेसीबी व अवजड माल वाहून नेणारा ट्रेलर रोखला व रस्त्याचे काम बंद पाडले.
याबाबतची माहिती दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना समजताच तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, नगरसेवक चेतन चव्हाण, प्रमोद कोळेकर, समीर रेडकर, प्रवीण गवस, बाळा कोरगावकर, चंदू मुळीक, देव शेटकर आदींनी घटनास्थळी जात शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. तसेच याबाबतची लेखी तक्रार तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्याकडे दिली.
त्यानुसार घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी नाना देसाई यांनी केला असून अनधिकृतरित्या रस्ता तयार झाल्याचे मान्य करीत तसा अहवाल तहसीलदारांकडे देणार असल्याचे सांगितले. यावेळी जमीनमालक कृष्णा रामा काळकेकर, नारायण आत्माराम सिदये, रूपेश रावजी खोत, सत्यवान बाबणी काळकेकर, सुरेश रामा गवस, चंद्रावती चंद्रकांत काळकेकर, नकुळ वासुदेव काळकेकर आदी शेतकरी उपस्थित होते.
तो पुढारी कोण?
वझरे येथे खडी क्रशर प्लान्टसाठी रस्ता खोदाईचे काम करताना एका राजकीय पक्षाचा पुढारी गावात येऊन जमीनमालकांना समजाविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्लान्ट शासनाचा आहे. त्यामुळे त्याला विरोध करू नका, असे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहे, असे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा पुढारी कोण याची चर्चा वझरे गावात सुरू आहे.