सिंधुदुर्ग शैक्षणिकदृष्ट्या राज्यात आघाडीवर
By admin | Published: February 7, 2017 11:05 PM2017-02-07T23:05:37+5:302017-02-07T23:05:37+5:30
‘प्रथम’ संस्थेचा अहवाल : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घेतल्या चाचण्या
सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक गुणवत्तेचा देशव्यापी अहवाल देणाऱ्या ‘प्रथम’ अशासकीय संस्थेच्या ‘असर’ या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणित व पुस्तक वाचन या दोन विषयांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यातून हे चित्र समोर आले आहे. या यादीत सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.
‘प्रथम’ ही एक स्वयंसेवी संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील सरकारी शाळांमधील गुणवत्तेचे चित्र समोर आणले आहे. यात शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा हा निकष समोर ठेवून राज्यात एकच अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता बहरत असल्याचा अहवाल ‘असर’ या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केला आहे. या निमित्ताने येथील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकामध्येही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’ आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
त्यानंतर इयत्ता दुसरीचा मजकूर वाचता येण्याचे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७१.६ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सोलापूर जिल्ह्याने पटकाविला असून, दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. याची सरासरी ८८ टक्के आहे. तर तृतीय क्रमांकावर रत्नागिरीचा समावेश आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तिसरी ते पाचवी बजाबाकी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सरासरी ३९.१ टक्के एवढे आहे. या प्रकारात मात्र सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून, त्याची सरासरी टक्केवारी ५६.९ टक्के आहे. तर प्रथम क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ६४.२ टक्के एवढी आहे. याही प्रकारात नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटी आहे. (प्रतिनिधी)
सातारा जिल्हा दुसऱ्या, तर रत्नागिरी तिसऱ्या स्थानी
इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील मजकुराचे वाचन करू शकणाऱ्या इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यात सरासरी प्रमाण ७२.५ टक्के आहे. यात अव्वल क्रमांक सिंधुदुर्गने पटकाविला असून, त्याची ९४ एवढी टक्केवारी आहे.
तर दुसऱ्या क्रमांकावर सातारा जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९२.५ एवढी आहे. तृतीय क्रमांकावर रत्नागिरी जिल्हा असून, त्याची टक्केवारी ९१.४ एवढी आहे. सर्वांत शेवटचा क्रमांक नंदुरबार जिल्ह्याचा असून, त्याची टक्केवारी ५१.१ एवढी आहे.