सिंधुदुर्ग : शैक्षणिक संकुलातील राड्यात आठ जखमी, वैभववाडी तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:33 PM2018-04-11T15:33:55+5:302018-04-11T15:33:55+5:30
वैभववाडी तालुक्यातील एका मोठ्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधील धुमसणारे रॅगिंग उफाळल्याने मंगळवारी सकाळी दोन गटात राडा झाला. सोमवारी रात्री दोनवेळा हाणामारी झाल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही गटाचे सव्वाशे-दीडशे विद्यार्थी लोखंडी सळ्या, विटा, दगड आणि बांबू घेऊन भिडले. त्यामध्ये आठ जण जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घुटमळणाऱ्या जखमींपैकी कुणीही तक्रार न दिल्याने या गंभीर प्रकारावर पडदा टाकण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील एका मोठ्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधील धुमसणारे रॅगिंग उफाळल्याने मंगळवारी सकाळी दोन गटात राडा झाला.
सोमवारी रात्री दोनवेळा हाणामारी झाल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही गटाचे सव्वाशे-दीडशे विद्यार्थी लोखंडी सळ्या, विटा, दगड आणि बांबू घेऊन भिडले. त्यामध्ये आठ जण जखमी झाले.
जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. मात्र, दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात घुटमळणाऱ्या जखमींपैकी कुणीही तक्रार न दिल्याने या गंभीर प्रकारावर पडदा टाकण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी शैक्षणिक संकुलाच्या परिसरातील राड्यात सोहम सुनील ऐनवडे (१९), सचिन उत्तम देशमुख (१९), अथर्व संजय लोणकर (१९), दिग्विजय संजय देवकर (१९), सचिन दिनकर गायकवाड (२१), मोसम अंकुश पोरे (२०), उमेश दिलीप पवार (२०), अर्जुन अरुण हाके (२०) हे आठ विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले आहे.
तालुक्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश केरळमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात तर काही वैभववाडी शहर व परिसरात राहतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडते.
सध्या या शैक्षणिक संकुलात कोल्हापूर आणि सोलापूर असा प्रांतिक वर्चस्वाचा वाद कित्येक महिन्यांपासून धुमसत आहे. या वादातून दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दोन गटात हाणामाऱ्या झाल्या होत्या. मात्र, त्यावेळीही प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. त्याचा परिणाम राड्यात झाला.
कोल्हापूर आणि सोलापूर या प्रांतिक वर्चस्वाच्या वादातून सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ठिणगी पडली. त्यावेळी किरकोळ हाणामारी होऊन प्रकरण शमले. मात्र, हा प्रकार वैभववाडी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना समजताच बाजारपेठेतील विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वसतिगृह गाठून जाब विचारत मारहाण सुरू केली. त्यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीच मध्यस्थी करून हाणामाऱ्या थांबविल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला.
तक्रार नोंदवून न घेण्यासाठी एका खासदाराचा फोन
शैक्षणिक संकुलातील राड्यात गंभीर जखमी झालेले विद्यार्थी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असताना सकाळी १०.३० च्या सुमारास कोल्हापूरहून एका खासदारांचा पोलिसांना फोन आला होता. त्या खासदार महोदयांनी तुम्ही तक्रार घेऊ नका, आम्ही आपसात मिटवून घेतो, असे पोलिसांना सांगितल्याचे ऐकायला मिळते.
मस्ती करताना जिन्यावरून पडलो
सततच्या हाणामाऱ्यांनी त्रस्त झाल्यामुळे व्यवस्थापनातील दोघांनी मंगळवारी अकराच्या सुमारास पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे या राड्याची तक्रार दाखल होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अचानक काही चक्रे फिरली आणि एकाही विद्यार्थ्याची तक्रार नसताना पोलिसांनी चक्क आपण मस्ती करताना जिन्यावरुन पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, कुणाविरुद्ध आपली तक्रार नाही असा कबुली जबाब एका विद्यार्थ्याकडून लिहून घेतल्याचे उघड झाले आहे.