सिंधुदुर्ग : नेतर्डे येथे सव्वा कोटीचे उत्खनन, गवस यांचे उपोषण मागे: बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:59 PM2018-07-07T17:59:10+5:302018-07-07T18:02:26+5:30
नेतर्डे येथील बेकादेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी नेतर्डे ग्रामस्थ जगदेव गवस यांनी तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा आपले उपोषण मागे घेतले. गवस यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी माजी आमदार राजन तेली व सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी यांनी शिष्टाई केली.
सिंधुदुर्ग : नेतर्डे येथील बेकादेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी नेतर्डे ग्रामस्थ जगदेव गवस यांनी तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा आपले उपोषण मागे घेतले. गवस यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी माजी आमदार राजन तेली व सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी यांनी शिष्टाई केली.
दरम्यान, नेतर्डे येथे गेलेल्या चौकशी पथकाने आपला अहवाल तहसीलदार सतीश कदम यांना सादर केला आहे. यात २६७२ ब्रास बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले असून, १ कोटी ३३ लाखाचा दंड प्रस्तावित केला आहे.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना नेतर्डे येथे जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे खांडेकर यांनी नायब तहसीलदार बी. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेतर्डे येथे पाठवले होते.
या पथकाने उत्खनन झालेल्या ठिकाणची मापे घेतली व किती ब्रास उत्खनन झाले आहे याची तपासणी केली. यात २६७२ ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाल्याचे या पथकाने अहवालात नमूद केले आहे.
याचा अंदाजे दंड १ कोटी ३३ लाख रूपये होत असून, हा दंड या पथकाने उत्खनन करणाऱ्या गोव्यातील तसेच स्थानिक दोघांवर बसवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची नावेही या पथकाने अहवालात नमूद केली आहेत. हा अहवाल शुक्रवारी गवस यांना दाखवण्यात आला.
तो त्यांनी स्वीकारला तसेच गवस यांनी आपले काही मुद्दे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच ज्यांना दंड झाला आहे त्यांच्यावर सात दिवसात कारवाई केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार सतीश कदम यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहे.
रात्री उशिरा चर्चेअंती तोडगा काढत गवस यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गवस यांना सरबत दिले. यावेळी नेतर्डे सरपंच प्रशांत कामत यांच्यासह रेमी आल्मेडा, नायब तहसीलदार बी. जी. पवार उपस्थित होते.
तेली, साळगावकर यांनी काढली समजूत
नेतर्डे येथे गेले दीड वर्ष बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. याबाबत गवस यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नसल्याने गवस यांनी तीन दिवसांपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
गवस यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी अनेकांनी शिष्टाई केली होती. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा माजी आमदार राजन तेली यांच्यासह सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, अशोक दळवी, नेतर्डे सरपंच प्रशांत कामत यांनी गवस यांची समजूत काढली तसेच त्यांना प्रशासन योग्य पध्दतीने कारवाई करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.