सिंधुदुर्ग : बनावट दारूसह कार जप्त, बावळाट येथे केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:01 PM2018-09-03T16:01:44+5:302018-09-03T16:04:20+5:30
गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वाहतूक करताना सावंतवाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चारचाकी गाडीसह दारू मिळून सुमारे ६ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सावंतवाडी : गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वाहतूक करताना सावंतवाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चारचाकी गाडीसह दारू मिळून सुमारे ६ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सावंतवाडी- आंबोली मार्गावर बावळाट येथे करण्यात आली.
अमर अंकुश रास्ते व नितीन देविदास पाटील (दोन्ही रा. पुणे) आणि सीताराम रामू जंगले व बाबुराव भैरू पाटील (दोन्ही रा. आंबेगाव सावंतवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. ते आपल्या ताब्यातील चारचाकी गाडीतून गोवा बनावटीची दारू घेऊन आंबोलीमार्गे पुणे अशी चोरटी वाहतूक करत होते.
दरम्यान, सावंतवाडी-आंबोली मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना बावळट तिठा येथे त्यांच्या कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये गोवा बनावटीची दारू आढळली.
याप्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडील १ लाख ९३ हजार रुपयांची दारू तसेच कार मिळून एकूण सहा लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार विश्वास सावंत व सावंतवाडी वाहतूक पोलीस सखाराम भोई यांनी केली. याची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.