सिंधुदुर्ग : दुर्लक्षितपणामुळे अपघाताची भीती, मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:30 PM2018-04-28T15:30:10+5:302018-04-28T15:30:10+5:30
मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही. या दुर्लक्षितपणामुळे त्याठिकाणी वाहन अपघात होण्याची भीती नागरिक तसेच वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.
सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक ती कोणतीही खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही. या दुर्लक्षितपणामुळे त्याठिकाणी वाहन अपघात होण्याची भीती नागरिक तसेच वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.
मळेवाड-कोंडुरा या सार्वजनिक बांधकामच्या महामार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाचे नवीन बांधकाम सध्या सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: कोलमडत असे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पुलाची मागणी गेली कित्येक वर्षे लोकांकडून केली जात होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या या कामाच्या ठिकाणी संबंधित विभागाने तसेच ठेकेदाराने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे टाळले असून केव्हाही अपघात होऊ शकतो अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. पुलाच्या बांधकामाच्या बाजूने पर्यायी रस्ता काढून त्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे.
मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी दिशादर्शक, बॅरिकेट्स तसेच धोेकादायक सूचना फलक किंवा रिफ्लेक्टर लावणे आवश्यक असताना तशी कोणतीही व्यवस्था त्या कामाच्या ठिकाणी करण्यात आली नाही.
एका बाजूने पुलाचे काम, तर दुसऱ्या बाजूने नदीचे पात्र अशा दोन्ही संकटाच्या मधून वाहनचालकांना तेथून मार्ग काढावा लागत आहे. मात्र, अपघात होऊ नये याची खबरदारी म्हणून त्याठिकाणी कोणतीही उपाययोजना न राबविल्याने दिवसा सोडाच, पण रात्रीच्या वेळी वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे.
मळेवाडहून कोंडुऱ्याच्या दिशेने येत असताना पुलाच्या कामाच्या आधी रस्त्याला वळण आहे. त्यामुळे हे काम वाहनचालकांच्या दृष्टीस येत नाही. त्यामुळे एखादा वाहनचालक थेट पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात होऊ शकतो. याबाबत बांधकाम विभागाने गांभीर्याने घेत याबाबत विचार करून खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पुलाचे काम धिम्यागतीने
पालक मंत्री दीपक के सरकर यांनी कोंडुरा येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाची अलीकडेच येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत चौकशी करीत अधिकाऱ्यांना काम लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र, असे असूनही पुलाचे काम धिम्यागतीने सुरू असून, पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना या पुलाचे काम वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न स्थानिकांतून विचारला जात आहे.