सिंधुदुर्ग : सिंधुसरस कृषी क्षेत्रासाठी पर्वणी : दीपक केसरकर, आंगणेवाडी येथे महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:53 PM2018-01-27T16:53:53+5:302018-01-27T16:58:23+5:30
भाविक आणि शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील पर्वणी ठरणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व सिंधु सरस महोत्सव होत आहे. पर्यटन जिल्हा अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यव्यापी कृषी प्रदर्शन मेळाव्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी भविष्यातील जिल्ह्याच्या विकासात कृषी महोत्सवांचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन वित्त व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
मालवण : भाविक आणि शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील पर्वणी ठरणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व सिंधु सरस महोत्सव होत आहे. पर्यटन जिल्हा अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यव्यापी कृषी प्रदर्शन मेळाव्याची आवश्यकता होती. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी भविष्यातील जिल्ह्याच्या विकासात कृषी महोत्सवांचे मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन वित्त व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
आंगणेवाडी येथे २५ ते २९ जानेवारी या कालावधीत राज्यशासन व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधु सरस महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक विजय चव्हाण, सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, तहसीलदार समीर घारे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव शेळके, महाराष्ट्र महाक्वॉयर बोर्डच्या लीना बनसोडे, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उपविभागीय कृषी अधीक्षक अडसूळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश महाले, जीवनोन्नोती अभियानाचे सिंधुदुर्ग प्रमुख देविदास नारनवरे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर तसेच इतर तालुक्यांचे गटविकास अधिकारी व प्रमुख व आंगणेवाडी मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे, मधुकर आंगणे, अनंत आंगणे आदी उपस्थित होते. बचतगटांचा सिंधु सरसला मोठा प्रतिसाद मिळाला असून बहुतांश सर्व स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचा व खाद्यपदार्थांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी करून केसरकर यांनी बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांना धान्य महोत्सव, चर्चासत्रे, पुरस्कार वितरण, गृहोपयोगी वस्तू, सूक्ष्म सिंचन, खाद्य पदार्थांचेही स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार असून लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे.
कृषी महोत्सवाचे उद्घाटन
आंगणेवाडी येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हा कृषी मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे अधिकृतरित्या उद्घाटन केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व चाकरमान्यांसाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात येथील नामांकित कृषी क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत असल्याने आंगणेवाडी येथील कृषी प्रदर्शन महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त करताना शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज झाला असल्याचे सांगितले.
विविध २०० स्टॉल
शासनाच्या कृषी विभागाकडून हे प्रदर्शन होत आहे. यात शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार आहे. सरकारी योजनांची माहिती देणारे कृषी विभागाच्या ४० स्टॉल्ससह विविध विभागांचे २०० स्टॉल लावले जातील.