सिंधुदुर्ग : संविधानाचा आधार घेऊन हक्कासाठी लढा : मेधा पाटकर, कणकवलीत सन्मान यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:02 PM2018-10-23T16:02:35+5:302018-10-23T16:05:23+5:30
कणकवली : शासनाकडून गरीब शेतकऱ्यांना कर्ज मुक्ति दिली जात नाही. मात्र भांडवलदाराना कर मुक्ति दिली जात आहे. गरीब , ...
कणकवली : शासनाकडून गरीब शेतकऱ्यांना कर्ज मुक्ति दिली जात नाही. मात्र भांडवलदाराना कर मुक्ति दिली जात आहे. गरीब , कष्टकरी, प्रकल्पग्रस्त अनेक समस्यामुळे भरडले जात आहेत. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशातच अशी भयावह स्थिती आहे. त्यामुळे ही स्थिती बदलण्यासाठी संविधानाचा आधार घेऊन जनसामान्याना आपला हक्क मिळविण्यासाठी लढायला उभे करावे लागेल. आणि संविधान यात्रेचा तोच खरा संदेश असेल, असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे केले.
संविधान सन्मान यात्रेचे आगमन सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कणकवलीत झाले. मुंबई - गोवा महामार्गावरील एस.एम. हायस्कूल समोर या यात्रेचे स्वागत करण्यात आले. तेथून कणकवली येथील बुध्दविहार पर्यन्त रॅली काढण्यात आली. तेथील डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आयोजित सभेत मेधा पाटकर बोलत होत्या.
यावेळी कवियत्री नीरजा, शाहिर संभाजी भगत, कमलताई परुळेकर, अड़. सुरेखा दळवी, , सुनीती सु.र. , बिहार मधील कष्टकरी चळवळीचे नेते आशिष रंजन, गुजरात मधील बुलेट ट्रेन विरोधी लढ़याचे नेते कृष्णकांत,
राजन इंदुलकर, बळवंत मोरे, युवराज मोहिते, मयूरेश कुमार , मीरा संघमित्रा, शारदा कांबळे, संजय मंगला गोपाळ, अर्पिता मुंबरकर, संदीप कदम, प्रदीप सर्पे, प्रा.प्रवीण बांदेकर, अड़. संदीप निंबाळकर, नामानंद मोडक, आनंद तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या , देशातील कुठल्याही पक्षाचे लोक असोत ते' अच्छे दिन आये है' असे म्हणण्याचे धाडस करणार नाहीत. सध्या देशात संवादहीनता तसेच संवेदनाहीनता पसरली आहे. त्यामुळे कोणाशिहि संवाद साधणे कठीण होऊन बसले आहे. देश चालविणारे समता, न्याय विसरले आहेत. 93 टक्के श्रमिक असुरक्षित आहेत. कोकणातच नव्हे तर देशभर शोषित, पिडितांची संख्या वाढत आहे. आज पर्यन्त शेतकरी, कष्टकरी , आदिवासी यांचे लढे लढताना आम्ही संविधानाचा आधार घेत आलो आहोत. यापुढेही घेत राहु. देशाचा विकास करण्याच्या नावाखाली कोणाची शेती किंवा कोणाचा व्यापार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेल्यास आम्ही गप्प बसणार नाही.
नाणार , जैतापुर असे प्रकल्प म्हणजे विकासाच्या नावाखाली आलेली सुनामी आहे. संविधानात सांगितलेला आमचा जगण्याचाच अधिकार विविध माध्यमातून हिरावुन घेतला जात आहे. श्रमिकांवर संक्रांत आली आहे. तर मच्छीमार देशोधडीला लागले आहेत. कंत्राटी कामगारांची संख्या वाढत आहे. याला जबाबदार कोण ? याचे उत्तर शासनाला द्यावेच लागेल.
पर्यावरणाचा नाश होत असून नद्या दूषित झाल्या आहेत. संविधान पायदळी तुडविल्याचे हे सर्व परिणाम आहेत.शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अनेक हत्या देशात घडत आहेत. स्त्रीयांवर अत्याचार होत आहेत. लोकशाहीच्या स्तंभाना धोका पोहचविला जात आहे. हा संविधाना वर हल्लाच आहे. त्यामुळे संविधान न माणणाऱ्याना सत्तेत बसण्याचा अधिकारच नाही.
शनिशिंगणापुर, शबरीमला मंदीरात महिलांना प्रवेश नाकारला जातो. महिला - पुरुष असा लिंग भेद केला जातो. समानता मानली जात नाही. समाजात विषमता वाढत आहे. त्यामुळे याविरोधात लढल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एकत्र या आणि संघर्ष करा.
जाती निर्मूलनासाठी आरक्षण देण्यात आले. मात्र , प्रत्येक जात आरक्षण मागते आहे. अशी स्थिती निर्माण व्हायला कोण जबाबदार आहे? याचा सखोल विचार करा. भूमिहिनाना जागा मिळाली पाहिजे. यासाठी जनआंदोलनाच्या माध्यमातून आम्ही लढत आहोत. सध्या कायदे बदलले जात आहेत. संविधानाचा अपमान केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्याच पूर्वीच्या भूमिका विसरत आहेत. सरदार पटेल यांचा पुतळा बनविला जात आहे. मात्र, चीनी मजूर तिथे काम करीत आहेत. हे नेमके काय चालले आहे ?
आधुनिक पर्यटनाच्या नावाखाली कोकणात होऊ घातलेले प्रकल्प कायद्याच्या आधारेच केले गेले पाहिजेत. अन्यथा ते आम्ही करु देणार नाही. कोकणातील विस्थापिताना भोगावे लागणारे कष्ट कमी करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विचार करून लढा उभारावा लागेल.
कणकवलीत या संविधान यात्रेच्या निमित्ताने उभी राहिलेली जनसामान्यांची ताकद या लढ्याला निश्चितच बळ देईल. संविधान पायदळी तुड़वायचे, अल्पसंख्याकाना हिणवायचे हे आम्हाला मान्य नाही. संविधानाच्या सन्मानासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर, काँ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी , गौरी लंकेश यांच्यासारखे शहीद व्हावे लागले तरी आम्ही डगमगणार नाही, असेही मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या .
सुरेखा दळवी यावेळी म्हणाल्या , लोकशाहीच्या आधारे निवडून आलेल्याना आता संविधान नको आहे. त्याना देशात मनुवाद आणायचा आहे. संविधान हे प्रत्येक नागरिकाचे आवडते पुस्तक असायला पाहिजे. ते कुठल्याही धर्मग्रन्था पेक्षा जास्त महत्वाचे आहे. संविधान सन्मान आंदोलन फक्त बाधितांचे नाही तर सर्व सामान्य जनतेचे झाले पाहिजे. असे झाले तरच या सन्मान यात्रेचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.
शाहिर संभाजी भगत म्हणाले, संविधान निर्मिती पासूनच काही जणांनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला. दिवसेंदिवस त्यांची भीड़ चेपत गेली आणि त्यातूनच जंतर मंतर वर संविधान जाळले गेले. सत्ताधाऱ्याना चार वर्षानंतर आता मंदिर बांधायची आठवण झाली आहे. मात्र, त्यांना मन्दिर बांधायचेच नाही. तर लोकशाहीचे थड़गे बांधायचे आहे. असेही ते म्हणाले .
यावेळी कृष्णकांत , पत्रकार युवराज मोहिते . कवियत्री नीरजा , संजय मंगला गोपाळ, अंकुश कदम , कमलताई परुळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रास्ताविक डी. के. कदम तर आभार डी.के. पडेलकर यांनी मानले.
घोषणानी सभास्थळ दुमदुमले !
या सभेच्या वेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.' संविधान , हमारा अधिकार ', ' कौन बनाता हिन्दुस्थान , हर मजूर, हर किसान ' अशा घोषणानी सभास्थळ दुमदुमुन गेले होते.