सिंधुदुर्ग : अखेर वाळू लिलावाला सापडला मुहूर्त, तब्बल तीन महिन्यानंतर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:57 PM2018-12-20T12:57:37+5:302018-12-20T13:01:28+5:30
वाळू लिलाव प्रक्रियेला यावेळी उशीर झाल्याने कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तब्बल तिन महिने रखडलेले वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ जाहीर केली आहे.
सिंधुदुर्गनगरी : वाळू लिलाव प्रक्रियेला यावेळी उशीर झाल्याने कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तब्बल तिन महिने रखडलेले वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ जाहीर केली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात खाडिपात्रातील साचलेला गाळ काढून नौकानयन मार्ग सुकर होण्यासाठी मेरीटाईम बोडामार्फत सर्वेक्षण करुन वाळूपट्टे निश्चित केले जातात. वाळू लिलाव प्रक्रिया होऊन वाळू उत्खनन सुरु होते. मात्र, यावर्षी डिसेंबर महिना संपत आला तरीही खाडीपात्रातील वाळू लिलाव प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली नाही.
परिणामी जिल्ह्यातील मजूर, चालक, मालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे रखडलेली ही वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ सुरू करा या मागणीसाठी कुडाळ तालुका डंपर चालक मालक संघटनेने बुधवार (१२ डिसेंबर) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून जिल्हाधिकाऱ्यांना वाळू उत्खनन बाबत अहवाल प्राप्त झाला. यानुसार जिल्हाधिकार्यानी पंधरा दिवसात आवश्यकती कार्यवाही पूर्ण करून हातपाटी वाळू उत्खनन परवाने दिले जाणार असल्याचे लेखी आश्वासन या डंपर चालक मालक संघटनेला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने डंपर आंदोलनाच्या चौथ्या दिवशीच वाळुसाठी लिलाव जाहिर केले आहे. या साठीची जाहिरात आज बुधवारी जाहीर होणार आहे.
१५ दिवसांत उत्खनन सुरु होणार
या वाळू लिलावामध्ये कालावल खाडीतील ६ आणि कर्ली खाडीतील ३ अशा एकूण ९ पट्ट्यातील वाळू काढण्यासाठी पट्टे निश्चित करून वाळू लिलावासाठी निविदा काढण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील वाळू व्यवसाइकांनी या वाळू लिलावाला प्रतिसाद देणे आवश्यक असून असे झाल्यास ही वाळू लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन १५ दिवसांत प्रत्यक्ष वाळू उत्खनन सुरु होऊन जिल्ह्याचा वाळू प्रश्न मार्गी लागणार आहे.