सिंधुदुर्ग : आयटीआयच्या शिपायावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, संस्थेच्या प्राचार्यांनी दिली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:31 PM2018-04-13T16:31:44+5:302018-04-13T16:31:44+5:30
बनावट वेतनचिठ्ठी व बोगस प्रमाणपत्र तयार करून शासन, बँक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशिक्षण संस्थेचे शिपाई राजन तुकाराम कदम याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. बी. चौगुले यांच्या तक्रारीवरून कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
वैभववाडी : बनावट वेतनचिठ्ठी व बोगस प्रमाणपत्र तयार करून शासन, बँक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशिक्षण संस्थेचे शिपाई राजन तुकाराम कदम याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डी. बी. चौगुले यांच्या तक्रारीवरून कदम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राजन कदम हा एडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. त्याने प्रशिक्षण संस्थेत अस्तित्वात नसलेल्या अभ्यासक्रमाचे बोगस प्रमाणपत्र बनवून त्यावर प्राचार्यांचा शिक्का व खोटी स्वाक्षरी करून ते ओझरम (ता. कणकवली) येथील युवकाला दिले.
तसेच रजा कालावधीतील बनावट वेतनचिठ्ठी बनवून वैभववाडी शहरातील तीन लोकांना तो कर्जासाठी जामीन राहिल्याचे आरोप कदमवर ठेवण्यात आले आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चौगुले यांच्या तक्रारीनुसार येथील प्रशिक्षण संस्थेत ह्यप्लंबरह्ण (नळ कारागीर) हा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र दिल्लीतील एन.सी.व्ही.टी संस्थेमार्फत दिले जाते.
मात्र, ओझरम येथील विराज रवींद्र राणे या युवकाने आॅगस्ट २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण करून तो उत्तीर्ण झाला असे बोगस प्रमाणपत्र संशयित आरोपी राजन कदम याने बनविले. त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून त्यांची खोटी स्वाक्षरी केली व ते प्रमाणपत्र कदम याने विराज राणेला दिले.
परंतु, विराज राणे नोकरीसाठी परदेशी जाणार असल्याने १ एप्रिलला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आला. त्याने मराठीतील प्लंबर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र इंग्रजीत रुपांतरीत करून देण्याची मागणी केली. त्यावेळी बोगस प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
विशेष म्हणजे प्रशिक्षण संस्थेत विराज राणेचा प्रवेशच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ५ एप्रिलला युनियन बँकेच्या फोंडाघाट शाखेचे कर्मचारी राजन कदम याला शोधत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आले. त्यामुळे बनावट वेतनचिठ्ठीचा प्रकार उघड झाला.
संशयित आरोपी राजन कदम हा २३ जानेवारी २०१७ ते १५ जुलै २०१७ या कालावधीत असाधारण रजेवर होता. त्या दरम्यान जून २०१७ ची बनावट वेतनचिठ्ठी बनवून तो युनियन बँकेच्या फोंडाघाट शाखेत वैभववाडी शहरातील तिघांना कर्जासाठी जामीन राहिला आहे.
त्या कर्जदारांचे हप्ते थकित राहिल्यामुळे बँकेचे कर्मचारी जामीनदार राजन कदमच्या शोधात प्रशिक्षण संस्थेत आले. त्यामुळेच कदम याने दोन प्रकरणात शासन, बँक आणि आपली फसवणूक केल्याची तक्रार प्राचार्य डी. बी. चौगुले यांनी दिली आहे.
चौगुले यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शिपाई राजन कदम याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कदम याला अटक झाली नव्हती.
आणखीही बोगस प्रमाणपत्रे, शक्यतांचा तपास होणे आवश्यक
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येथे उपलब्ध नसलेल्या अभ्यासक्रमाचे बोगस प्रमाणपत्र तयार करून दिल्याचे उघड झाल्याने प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे यापूर्वी आणखीही अशाच प्रकारची विविध अभ्यासक्रमांची बोगस प्रमाणपत्रे बनवून दिली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या अनुषंगाने शक्यतांचा तपास होणे आवश्यक आहे.