सिंधुदुर्ग : आचरा माळरानाला आग, ग्रामस्थांच्या मदतीमुळे आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:20 PM2018-01-30T14:20:09+5:302018-01-30T14:24:15+5:30
आचरा-कणकवली रस्त्यानजीकच्या माळरानाला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या माळरानावर मोठ्या प्रमाणात कलमबागा, काजू बागा आहेत. जोराच्या वाऱ्यांमुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते.
आचरा : आचरा-कणकवली रस्त्यानजीकच्या माळरानाला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या माळरानावर मोठ्या प्रमाणात कलमबागा, काजू बागा आहेत.
जोराच्या वाऱ्यांमुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. मात्र, ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे एक तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता. आचरा माळरानावर आचरा-कणकवली रस्त्याच्या बाजूने आग लागून माळरानावर पसरत होती.
या माळरानावर आंबा, काजू बागा तसेच घरे, मांगरही आहेत. आग लागल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ अभिजीत सावंत, परेश सावंत, मंदार घाडी, नंदू शेवरेकर, बाळा घाडी, आबा आंबेरकर, आनंद राणे आदी ग्रामस्थांनी धाव घेत एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग वेळीच रोखल्याने कलम, काजूबाग, घरे, मांगर यांचा धोका टळला.