सिंधुदुर्ग : पहिल्याच पावसात लाकडी साकव गेला वाहून, पुलाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:09 PM2018-06-12T17:09:55+5:302018-06-12T17:09:55+5:30
बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने उभारलेला लाकडी साकव वाहून गेला. काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी पुलाचे काम सुरु करण्यात आले असून यावर्षी पावसाळ्यात मात्र आरोसबागवासीयांना बांदा शहरात येण्यासाठी होडीचाच आधार घ्यावा लागणार आहे.
मालवण : बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने उभारलेला लाकडी साकव वाहून गेला. काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी पुलाचे काम सुरु करण्यात आले असून यावर्षी पावसाळ्यात मात्र आरोसबागवासीयांना बांदा शहरात येण्यासाठी होडीचाच आधार घ्यावा लागणार आहे.
गेले दोन दिवस बांदा शहर व परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागल्याने ग्रामस्थांनी श्रमदानाने उभारलेल्या लाकडी साकवाचा नदीपात्रात टिकाव लागला नाही. परिणामी लाकडी साकव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
सोमवार हा बांद्याचा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने या साकवावरुन आरोसबागवासीयांनी पहाटेच्या सुमारास प्रवास देखील केला. मात्र त्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने साकव वाहून गेला. नदीचा वेगवान प्रवाह साकवावरुन वाहू लागल्याने आरोसबाग ग्रामस्थांनी तातडीने याठिकाणी गर्दी करत साकवावरुन प्रवास करण्यास मज्जाव केला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
आरोसबाग ग्रामस्थ दरवर्षी जानेवारी महिन्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकवाची उभारणी करतात. पावसाळयात मात्र आरोसबागवासीयांना बांदा शहरात येण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागतो.
येथील ग्रामस्थांची गेली कित्येक वर्षे नदीपात्रावर पुलाची मागणी आहे. यावर्षी मात्र आरोसबागवासीयांच्या पुलाच्या मागणीला मूर्त स्वरुप मिळाले. काही महिन्यांपूर्वीच या नदीपात्रावर पुलाच्या उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लाकडी साकव वाहून गेल्याने ग्रामस्थांनी तातडीने श्रमदानाने नदीपात्रात होडीसेवा सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत शाळा सुरु होणार असल्याने या नदीपात्रातील रहदारी वाढणार आहे. त्यामुळे नदीपात्रात आरोसबाग ग्रामस्थ श्रमदानाने होडीसेवा देणार आहेत.