सिंधुदुर्ग : मत्स्य आयुक्तांना सुनावले, मालवणात ट्रॉलर्सची घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:44 PM2018-09-20T17:44:50+5:302018-09-20T17:46:35+5:30
सिंधुदुर्ग येथील समुद्रात सोमवारी पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची जाळी जप्त करण्याची तसेच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव तत्काळ तहसीलदारांकडे सादर करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांना दिल्या.
सिंधुदुर्ग : येथील समुद्रात सोमवारी पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची जाळी जप्त करण्याची तसेच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव तत्काळ तहसीलदारांकडे सादर करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांना दिल्या.
दरम्यान, समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना तुमचा भ्रमणध्वनी सातत्याने बंद असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत आमदार नाईक यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त महाडिक यांना चांगलेच सुनावले.
मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी तहसीलदार समीर घारे यांची भेट घेत पर्ससीन ट्रॉलर्सवरील कारवाईबाबत चर्चा केली. यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी येथील समुद्रात पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर कडक कारवाई करण्यात यावी. संबंधित ट्रॉलर्सना ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारीचा परवाना असताना त्यांच्याकडे पर्ससीनची जाळी आढळून आली आहेत. त्यामुळे ही जाळी जप्त करण्याबरोबरच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याची कारवाई करा. यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ तहसीलदार यांच्याकडे सादर करा, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या. यासंदर्भात नाईक यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.
चुकीची कारवाई, कार्यकर्ते बदनाम
दोन दिवसांपूर्वी पळून गेलेल्या रत्नागिरीतील ट्रॉलर्सवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कडक कारवाई न झाल्याने आमदार नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परराज्यातील ट्रॉलर्स पकडून देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईमुळे आमचे कार्यकर्ते बदनाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ट्रॉलरविरोधात पुन्हा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार द्यावी, अशी सूचना त्यांनी महाडिक यांना दिली.