सिंधुदुर्ग : जबरदस्तीने धर्मांतर; कारवाई करा, नीतेश राणेंची पोलिसांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:31 PM2018-08-28T16:31:01+5:302018-08-28T16:37:02+5:30
पोलिसांनी हिंदू धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा कडक शब्दात आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्गचे प्रभारी निरीक्षक जयदीप कळेकर यांना ठणकावून सांगितले.
दोडामार्ग : दोडामार्गमध्ये धर्मांतरावरून सुरू झालेल्या वादास जर पोलीसच साथ देत असतील तर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आज शहरात हा प्रकार घडला, यापुढे तालुक्याच्या ग्रामीण भागातही असे प्रकार घडतील. त्यामुळे पोलिसांनी हिंदू धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा कडक शब्दात आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्गचे प्रभारी निरीक्षक जयदीप कळेकर यांना ठणकावून सांगितले.
दोन दिवसांपूर्वीच दोडामार्ग शहरात हिंदू धर्मीयांचे ख्रिस्ती धर्मात जबरदस्तीने धर्मांतर करण्यावरून वाद निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील गोपाळ गावडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार नीतेश राणे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याला भेट देत प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याशी चर्चा केली.
हिंंदू धर्मीयांचे जबरदस्तीने ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रकार आज दोडामार्ग शहरात घडला. तो प्रकार पुढे ग्रामीण भागातही घडू शकतो. त्यामुळे याला वेळीच आवर घालायला हवा. पोलिसांनी याची पाळेमुळे खोदून काढली पाहिजेत, असे राणे यांनी सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी हिंदू धर्मीयांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते चुकीचे आहे. जे त्यावेळी हजर नव्हते, अशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
जर पोलीसच जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना साथ देत असतील, तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असे राणे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता पुढे कोणती कारवाई होते आणि कोणाची नावे वगळली जातात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सखोल चौकशीअंती त्यांची नावे वगळणार
कसई-दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी पोलिसांना याबाबत चार महिन्यांपूर्वी कल्पना दिली होती. मात्र त्यांनी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळेच हा प्रकार निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर केला.
यावर जयदीप कळेकर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून जे घटनेवेळी उपस्थित नव्हते त्यांची नावे गुन्ह्यातून वगळली जातील, अशी ग्वाही दिली.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे माजी तालुकाध्यक्ष रमेश दळवी, कसई-दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, राजू निंबाळकर, विठोबा पालयेकर आदी उपस्थित होते.