सिंधुदुर्ग : वनविभाग, वीज कंपनीमुळे ४० घरे विजेपासून वंचित : राजन तेली यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:25 AM2018-03-28T11:25:40+5:302018-03-28T11:25:40+5:30
वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत.
सिंधुदुर्ग : वनविभागाकडून वीज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यामुळे चौकुळ बेरडकी येथील आदिवासी वाड्यातील तब्बल चाळीस घरे विजेपासून आजही वंचित आहेत. याला वनविभाग आणि वीज वितरणच्या अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे मुख्य कारण समोर येत आहे.
तरीही लोकांचा प्रश्न लक्षात घेता लवकरात लवकर यावर तोडगा काढून कामे पूर्ण करा, अन्यथा संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिला.
तालुक्यातील चौकुळ-चिखलव्हाळ बेरडकी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांनी गेल्या सहा वर्षांपूर्वीपासून आपल्या झोपड्यात वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार संबंधितांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पंचायत समिती उपसभापती महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता.
दरम्यान, गेले काही महिने हे काम सुरू होते. मात्र विजेचे खांब घालण्यात येणारा काही भाग हा वनजमिनीत येत असल्याचे कारण पुढे करुन त्याठिकाणी वीज कार्यालयाकडून करण्यात आलेले काम रोखण्यात आले आहे. तसेच आपली कोणतीही परवानगी न घेता काम सुरू ठेवल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. आपल्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत या भीतीने त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांनी वीज खांब उभारण्याचे काम अर्धवट टाकले आहे.
दरम्यान, याबाबत तेथील लोकांनी तेली यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, दोन्ही कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून याबाबत योग्य तो तोडगा काढावा आणि ते काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकाराबाबत आपण संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असे तेली यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजू गावडे, सीताराम परब आदी उपस्थित होते.
समन्वयाअभावी काम रखडले
तेली यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही कार्यालयात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले. उपवनसंरक्षक चव्हाण म्हणाले, वनविभागाच्या हद्दीत काम करण्यास कायद्याने परवानगी मिळू शकते. मात्र तेथील जबाबदारी असलेले वीज अधिकारी चुकीच्या पध्दतीने आमची कोणतीही परवानगी न घेता काम करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला. त्यांनी रितसर परवानगी मागितल्यास आमचा कोणताही विरोध असणार नव्हता, मात्र तशी प्रक्रिया संबधितांकडून झाली नाही, असे त्यांनी सांगितले.