सिंधुदुर्ग : चार सार्वत्रिक, एक पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:50 PM2018-08-27T12:50:22+5:302018-08-27T12:52:33+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये २६ सप्टेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये २६ सप्टेंबर २०१८ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
मुदत संपलेल्या राज्यातील १०४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीची सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक होत आहे.
सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील बोडन या ग्रामपंचायतीच्या ७ सदस्य पदांसाठी निवडणूक होत असून, या ग्रामपंचायतसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी सरपंचपद राखीव आहे. तर कुडासे- खुर्द या ग्रामपंचायतीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी हे सरपंच पद राखीव असून या ग्रामपंचायत साठी ७ सदस्य संख्या आहे.
साटेली- भेडशी या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव असून, या ठिकाणी ११ सदस्य संख्या आहे. देवगड तालुक्यातील ठाकुरवाडी या ग्रामपंचायतसाठी ७ सदस्य संख्या असून या साठी सरपंच पद हे अनुसूचित जाती स्त्री राखीव आहे.
या आहेत ग्रामपंचायती
दोडामार्ग तालुक्यातील बोडण, कुडासे-खुर्द, आणि साटेली -भेडशी तर देवगड तालुक्यातील ठाकुरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तर सावंतवाडी तालुक्यातील मडुरा या ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे.
२७ रोजी होणार मतमोजणी
या निवडणुकीसाठी ५ सप्टेंबर २०१८ ते १ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरणे, १२ सप्टेंबर अर्जांची छाननी, १५ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि त्याच दिवशी निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. तर २६ सप्टेंबर रोजी मतदान आणि २७ रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता सुरु झाली आहे.
मडुऱ्यात पोटनिवडणूक
सावंतवाडी तालुक्यातील मडुरे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वेदिका मडूरकर या नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या राखीव जागेवरून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी आपल्या सरपंच या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त सरपंच पदासाठीही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.