सिंधुदुर्ग : कणकवलीत कचरा निर्मूलन प्रकल्प, जिल्ह्यातील कचरा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 04:07 PM2018-07-25T16:07:53+5:302018-07-25T16:12:05+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कणकवली येथे मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर डंपिंग ग्राऊंडवर कचरा निर्मूलन प्रकल्प साकारणार आहे. या कचऱ्यांपासून वीज, इंधन, पाणी तयार करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कणकवली येथे मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर डंपिंग ग्राऊंडवर कचरा निर्मूलन प्रकल्प साकारणार आहे. या कचऱ्यांपासून वीज, इंधन, पाणी तयार करण्यात येणार आहे.
ए. जी. डॉटर्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्यातून जिल्ह्यात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला असून याबाबतचे सादरीकरण आज जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यामुळे जिल्ह्यातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कचऱ्यांची फार मोठी समस्या असून कचऱ्यांचा प्रश्न म्हणजे स्थानिक नगरपालिका, नगरपंचायतींची डोकेदुखी बनला आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी अभिनव संकल्पना सिंधुदुर्गात आणली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ए. जी. डॉटर्स या कंपनीच्या सहाय्याने सिंधुदुर्ग हा कचरामुक्त जिल्हा बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येथील जिल्हा नियोजन सभागृहात मंगळवारी या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, आठही नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यानंतर आमदार नीतेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मनिष दळवी उपस्थित होते.
राणे म्हणाले, सिंधुदुर्गातून प्रतिदिन १८० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्यातून पिण्याचे शुद्ध पाणी, गॅस, इंधन उपलब्ध करता येणार आहे. महाराष्ट्राच्या एकूण विजेच्या वापराच्या १० टक्के वीज येथील कचऱ्यापासून सिंधुदुर्गात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. युनिटचे काम सुरू झाल्यानंतर ९ ते १० महिन्यात येथील प्लांट प्रत्यक्षात साकारेल. सिंधुदुर्गातून डिझेलदेखील तयार होणार आहे.
येथील इंधन, गॅस अत्यंत कमी दरात मिळणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबवून तेथील सर्व कचरा कंपनीच्या खर्चात उचलला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नसून उलट कंपनी आपल्या वार्षिक नफ्याच्या १ टक्का रक्कम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देणार आहे.
येथे जवळपास ५ हजार कोटींची गुंतवणूक कंपनी करणार असून संपूर्ण जिल्ह्याचा कचरा गोळा करून प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ५ एकर जागा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये आज कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन, पाणी उपलब्ध केले जात असल्याचे ते म्हणाले.
...तर देशातील पहिला कचरामुक्त जिल्हा
कचरा म्हणजे खरे तर फार मोठी समस्या मानली जाते. मात्र, याच कचऱ्यांचे योग्य नियोजन झाल्यास हा कचरा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वरदान ठरू शकतो. यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींनी आणि ग्रामपंचायतींनी पुढे येऊन यामध्ये सहभाग दिल्यास सिंधुदुर्ग हा देशातील पहिला कचरामुक्त जिल्हा होईल, असेही राणे यांनी सांगितले.