सिंधुदुर्ग : फोटो स्टुडिओ फोडी प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:18 PM2018-05-31T15:18:01+5:302018-05-31T15:18:01+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटो स्टुडिओ फोडून आतील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मूळ महाजनी गावातील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

Sindhudurg: Gazaad, the main accused in the photo studio blasphemy case | सिंधुदुर्ग : फोटो स्टुडिओ फोडी प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

फोटो स्टुडिओ चोरी प्रकरणातील आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

Next
ठळक मुद्देरायगड येथील जंगलातून मुसक्या आवळल्या :दीक्षितकुमार गेडाम एलसीबीची कारवाई, साडेपाच लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटो स्टुडिओ फोडून आतील लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मूळ महाजनी गावातील सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.

सुकेळी (ता. रोहा, जि. रायगड) जंगलातून महेंद्र बामा अवचटकर (३४) या सराईत चोरट्याला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेल्या साडेआठ लाखांपैकी साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उर्वरित मुद्देमालही हस्तगत केला जाणार आहे. तसेच त्याच्या साथीदारांनाही लवकरच गजाआड करू, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ चोरी प्रकरणातील पकडलेला आरोपी व हस्तगत केलेला मुद्देमाल या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील उपस्थित होते.

यावेळी दीक्षितकुमार गेडाम म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१७ साली देवगडमध्ये तर जानेवारी २०१८ ते मे २०१८ या कालावधीत अज्ञात चोरट्याने देवगड, कुडाळ, मालवण व बांदा या ठिकाणच्या फोटो स्टुडिओंच्या शटरचे कुलूप तोडून आतील किमती कॅमेरे, कॅमेऱ्यांचे लेन्स, लॅपटॉप तसेच कुडाळ येथील रेणुका स्वीट मार्ट फोडून त्यातील विविध साहित्य चोरुन नेऊन पोलिसांना आव्हान दिले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ मालकांमध्ये घबराट निर्माण झालेली होती. त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा फोटोग्राफर संघटनेने अप्पर पोलीस अधीक्षक यांना समक्ष भेटून चोरी प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली होती.

या चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन आपल्यापरीने प्रयत्न करीत असले तरी या चोऱ्यांचा अधिक तपास करण्यासाठी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एलसीबीने या तपासासाठी विशेष पथक तयार केले होते.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने या चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी चोरी करण्याची पद्धत ही एकच असल्याने या चोऱ्यांमध्ये एकाच टोळीचा किंवा एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला होता व त्या दृष्टीने माहिती मिळविण्याचा व अज्ञात चोरट्याचा तपास सुरू केलेला होता, असेही गेडाम यांनी सांगितले.

या आरोपीचा जंगलमय भागात शोध घेऊन त्याला मंगळवार २९ मे रोजी रात्री ११ वाजता ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती देत त्याला बुधवारी मालवण न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी स्पष्ट केले.


अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा

चोरीचे प्रकार जिल्ह्यात घडत होते. त्यादृष्टीने जिल्हा पोलीस तपास करीत होते. मात्र फोटो स्टुडिओ चोरीप्रकरण जिल्ह्याला नवीनच असल्याने चोरांचा शोध घेणे एक प्रकारचे आव्हानच होते. हे चोरी प्रकरण उघडकीस आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पोलीस दलाला फायदा झाल्याचेही पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी स्पष्ट केले.


साथीदारांचा शोध सुरू

जिल्ह्यात सध्या घडलेल्या फोटो स्टुडिओ चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगार सुकेळी (रायगड) येथून ताब्यात घेण्यात आला आहे. या गुह्यांमध्ये या चोरट्याचे साथीदार असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. त्यांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच गजाआड करू, अशी माहिती गेडाम यांनी दिली.

Web Title: Sindhudurg: Gazaad, the main accused in the photo studio blasphemy case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.