सिंधुदुर्ग : ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याची चेन लंपास, कणकवलीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 06:16 PM2018-12-29T18:16:28+5:302018-12-29T18:17:50+5:30
कणकवली येथील एस एम हायस्कूल शेजारील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कणकवली शाखेत ग्राहक म्हणून आलेल्या अज्ञात दोन महिला व एका पुरुषाने 30 ग्रॅम वजनाची 1लाख 10 हजार रूपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास घड़ली.
कणकवली : येथील एस एम हायस्कूल शेजारील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कणकवली शाखेत ग्राहक म्हणून आलेल्या अज्ञात दोन महिला व एका पुरुषाने 30 ग्रॅम वजनाची 1लाख 10 हजार रूपये किमतीची सोन्याची चेन लंपास केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास घड़ली.
वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या कणकवली शाखेत शुक्रवारी दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी सोन्याचे दागिणे खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला व एक पुरुष आले. यातील महिलांचे वय साधारणतः 55 वर्षे तर पुरुषाचे वय 40 वर्षे होते.
त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातील सेल्समनला सोन्याची चेन दाखवायला सांगितले. ती बघत असताना एका महिलेने 30 ग्रॅम वजनाची चेन हळूच दुसऱ्या महिलेकडे दिली. ती चेन परत सेल्समनकडे दिलीच नाही. त्यानंतर चेन पसंत नसल्याचे सांगत त्या तिन्ही चोरट्यांनी दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी पलायन केले. थोड्या वेळाने ही बाब सेल्समनच्या लक्षात आली. त्यांनी व्यवस्थापक तसेच इतर सहकाऱ्यांना ही घटना सांगितली.
त्यानंतर त्या चोरट्यांचा शोध घेण्यात आला . मात्र, ते आढळून आले नाहीत . त्यामुळे या घटनेबाबत शाखा व्यवस्थापक अमित नारायण अपराज यानी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली . पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांचा शोध सुरु केला आहे. हे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना सोपे होणार आहे.