सिंधुदुर्ग : शेळ लागणे मासेमारीसाठी शुभ संकेत, मासळीचे किनारपट्टीवर होते स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:37 PM2018-09-04T14:37:01+5:302018-09-04T14:42:05+5:30
समुद्रात ज्यावेळी शेळ लागते त्यावेळी तो मच्छिमारांसाठी शुभ संकेत असतो. कारण याच काळात किनारपट्टीवर रापणीच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन होते.
मालवण : श्रावण महिन्यात जाणवणाऱ्या गारव्याचे परिणाम सागरी जीवांवर होत असतात. मच्छिमारांच्या मते समुद्रात थंड पाण्याची प्रक्रिया होत असल्याने विविध प्रजातींच्या मासळीला थंडी लागते. त्यामुळे ते बचावासाठी किनाऱ्यावर येतात.
समुद्रात निर्माण होणाऱ्या गारव्यास स्थानिक भाषेत शेळ लागणे असे संबोधले जाते. समुद्रात ज्यावेळी शेळ लागते त्यावेळी तो मच्छिमारांसाठी शुभ संकेत असतो. कारण याच काळात किनारपट्टीवर रापणीच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन होते.
समुद्राच्या पाण्याची श्रावणात थंड होण्याची प्रक्रिया सुरु असते. या काळात मासळी अगदी किनाऱ्यालगत येते. मच्छिमारांच्या मते समुद्राचे पाणी थंड होऊ लागल्याने अनेक प्रजातीच्या मासळींना गारवा सहन होत नाही.
समुद्रात शेळ पडल्यावर माशांना थंडी वाजत असावी, असा अंदाज आहे. त्यामुळे मत्स्य प्रजननाचा काळ संपल्यानंतर मासळीचे थवेच्या थवे किनाऱ्यालगत असतात.
मासळीला खोल समुद्रात थंडी सहन होत नसावी म्हणून मासे झुंडीने एकमेकांना ऊब देऊन किनाऱ्यावरील काहीशा उष्ण तापमानाच्या दिशेने स्थलांतर करतात. हा साधारण कालावधी आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात होत असल्याने मत्स्य हंगामाची सुरुवात मच्छिमारांसाठी दरवर्षी सुखावह असते.
शेळ लागणे हा प्रकार मच्छिमार समाजामध्ये फार जुना आहे. शेळ पडताना समुद्रात उत्तरेकडचे वारे वाहू लागतात आणि तेच वारे मासेमारीसाठी पोषक असतात. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या रोजीरोटीचा विचार केला तर साधारण आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत आधुनिक प्रकारची मासेमारीची घुसखोरी रोखणे आवश्यक असते.
शेळ लागण्याचे प्रकार दिवाळी पाडव्यापर्यंत होत असतात, असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे. मात्र शेळ लागणे या प्रकाराचे शास्त्रीय कारणही समुद्राच्या तापनामावरच अवलंबून आहे. मच्छिमार व शास्त्रीय कारणात विरोधाभास असला तरी थंड तापमान व बचावासाठी मासळी किनाऱ्यावर येते, हे स्पष्ट होते.
मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर सांगतात की, शेळ लागणे हा मासेमारीसाठी पोषक काळ असतो. या काळात समुद्राचे पाणी थंड होण्याची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे मासे थंड तापमानापासून बचाव व खाद्याच्या शोधार्थ खोल समुद्रातून किनारपट्टीच्या दिशेने स्थलांतर करतात.
खोल समुद्रात सूर्यप्रकाश कमी पडत असल्यामुळे तापमानाबरोबरच खाद्य शोधासाठी ते किनाऱ्यावर झुंडीने येतात. समुद्रात शेळ लागली की पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात अपेक्षित मासळी मिळते.
मालवणात दोन दिवसांपूर्वी खवळे माशाचा बंपर कॅच मिळाला, त्याचेही कारण तेच आहे. खोल समुद्रातील खवळे, पापलेट, कोळंबी, तारली, वागळी, मोरी, काडय आदी प्रजातीची मासळी १० ते १२ वाव समुद्रात वास्तव्य करण्यासाठी आलेली असते. त्यामुळे पर्ससीन किंवा आधुनिक मासेमारीच्या नौकांची सागरी जलधि क्षेत्रातील घुसखोरी रोखणे आवश्यक आहे.
शेळ लागणे या समुद्रातील प्रक्रियेचे शास्त्रीय कारणही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक केतन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शेळ लागणे म्हणजेच खोल समुद्रात पाण्याचे प्रवाह बदलतात. दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने हे प्रवाह वाहू लागल्याने समुद्राचे तापमान काही दिवसात थंड होण्यास सुरुवात होते.
शेळ पडते त्या काळात माशांना थंडी वाजते का? असे विचारले असता त्यांनी समुद्रात माशांना थंडी वाजत नाही. मात्र खोल समुद्रात सूर्यप्रकाश कमी पडतो. त्यामुळे तेथे मासळीला आवश्यक असलेले खाद्य मिळत नाही. त्यामुळे योग्यठिकाणी म्हणजेच समुद्र किनाऱ्यालगत काही दिवसांपासून स्थलांतर करतात. याचवेळी मत्स्य हंगाम सुरु असल्यामुळे मत्स्य उत्पादन क्षमताही वाढते, असे चौधरी म्हणाले.
मत्स्य प्रजाती करतात स्थलांतर : केतन चौधरी
खोल समुद्रात पाण्याचे प्रवाह बदलण्याची प्रक्रिया साधारणपणे आॅगस्टपासून सुरु होते. त्यामुळे समुद्रात गारवा निर्माण होतो. खोल समुद्रात सूर्यप्रकाशाची किरणे पोहोचत नसल्याने विविध प्रजातीच्या माशांना त्यांचे खाद्य मिळत नाही.
ज्यावेळी शेळ लागण्याची प्रक्रिया सुरु होते त्यावेळी खोल समुद्रात मत्स्य जीवांना वनस्पतीजन्य व प्राणीजन्य खाद्य मिळत नाही. त्यामुळे मासळीच्या झुंडी किनाऱ्यालगत मिळणाऱ्या सूर्यप्रकाश व वनस्पतीजन्य, प्राणिजन्य खाद्य खाण्यासाठी येतात. समुद्रातील शेळ लागणे ही एक नैसर्गिक साखळी आहे. समुद्री मासे हे थंडी वाजते म्हणून नाही तर आपल्या खाद्याच्या शोधार्थ काही दिवसांसाठी स्थलांतर करतात, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे प्रा. केतन चौधरी यांनी दिली.