सिंधुदुर्ग : कोकण विभाग पदवीधर : आयुक्तांकडून निवडणूकपूर्व आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:44 PM2018-06-18T15:44:03+5:302018-06-18T16:06:10+5:30
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार २५ जून रोजी मतदान होणार असून, गुरुवार २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
सिंधुदुर्ग : मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार २५ जून रोजी मतदान होणार असून, गुरुवार २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
या अनुषंगाने कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूकपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश डॉ. पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेऊन सूचना दिल्या.
निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक विषयक विविध परवाने घेण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते, हे टाळण्यासाठी व उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करावी असे सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे (मुंबई शहर), सचिन कुर्वे (मुंबई उपनगर) डॉ. महेंद्र कल्याणकर (ठाणे), प्रदीप पी. (रत्नागिरी), दिलीप पांढरपट्टे (सिंधुदुर्ग) तसेच रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, सामान्य प्रशासन उपआयुक्त महेंद्र वारभुवन, महसूलचे सिध्दराम सालीमठ, करमणूकचे शिवाजी कादबाने, पुरवठाचे दिलीप गुट्टे, ह्यरोहयोह्णचे अशोक पाटील, पुनर्वसनचे अरुण अभंग तसेच जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.
मुंबई पदवीधर
मुंबई पदवीधर मतदारसंघात मुंबई उपनगर ५२,२८३, मुंबई शहर १८,३५३ असे एकूण ७०,६३६ मतदार आहेत. हे उमेदवार कोणाला पसंती देणार हे पाहायचे आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघ
मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये मुंबई उपनगर ८,२५२, मुंबई शहर १,८८९ असे एकूण १०,१४१ मतदार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी आगरी-कोळी भवन, सेक्टर - २४, नेरुळ, नवी मुंबई येथे होणार आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ
पालघर १६,९८२, ठाणे ४५,८३४, रायगड १९,९१८, रत्नागिरी १६,२२२, सिंधुदुर्ग ५,३०८ असे एकूण १,०४,२६४ मतदार आहेत.