सिंधुदुर्गात आपत्कालीन यंत्रणेसाठी १४ कोटींचा निधी मंजूर, पालकमंत्री दीपक केसरकर यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:42 AM2019-08-16T03:42:59+5:302019-08-16T03:43:42+5:30
पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल; तसेच जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गनगरी : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल; तसेच जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी ही बैठक पार पडली. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, जयदेव कदम, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.
पूरग्रस्त भागासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये २ कोटी ५८ लाख जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी, १ कोटी ५० लाख सा.बां. विभाग सावंतवाडी, २ कोटी ५ लाख सा.बां. विभाग कणकवली आणि २२ लाख रुपये शाळांच्या दुरुस्तीसाठी देण्यात येणार आहेत. या निधीमधून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते, पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे.
तसेच जिल्ह्यात स्वत:ची आपत्कालीन यंत्रणा उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून बोटी, त्यांच्या वाहतुकीसाठी वाहन, लोकांना पाण्यातून बाहेर काढता यावे यासाठी लागणारे रोप, लाइफ जॅकेट आदी वस्तूंची खरेदी करण्यात येणार आहे. या प्रकारच्या वस्तू स्थानिक स्तरावर बचावकार्य करणाऱ्या संस्थांनाही पुरवण्यात येतील. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या विविध कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी स्वतंत्ररीत्या मंजूर करण्यात आल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.
हायस्पीड गस्ती नौका मंजूर
एलईडी मासेमारी रोखण्यासाठी जिल्ह्यात हायस्पीड गस्ती नौका मंजूर झाल्या असून, त्या लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
मात्र, तात्पुरत्या स्वरूपात पोलीस प्रशासनाने अशा बोटी भाड्याने
घेऊन गस्ती सुरू करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच एलईडी मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाºया एलईडी लाइट जप्त करण्याविषयी शासन स्तरावर कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. तसेच अशा प्रकारे मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या.
या विषयांवर झाली चर्चा...
एम.एस.ई.बी.मधील कर्मचाºयांची कमतरता, जलयुक्त शिवार योजनेमध्ये लोकप्रतिनिधींना प्रस्ताव तयार करताना समाविष्ट करणे, तिलारी प्रकल्पातील वृक्ष तोडणे, कोळंब पुलाला पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती, सिंधुदुर्ग नगरी येथे मुलींचे वसतिगृह उभारणे, एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी, परराज्यातील मासेमारी नौका, साकवांऐवजी ब्रिज कम बंधारा बांधणे या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
‘कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या
स्मारकाविषयी अहवाल द्या’
उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकाच्या कामाविषयी चर्चा झाली. पर्यटन विकास महामंडळाने याविषयी त्वरीत कार्यवाही करावी व सात दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना अध्यक्षांनी दिली.