सिंधुदुर्ग : सावरवाडी येथील संजू परब यांच्या उपोषणाला मोठी उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 14:10 IST2018-03-13T14:10:50+5:302018-03-13T14:10:50+5:30
सुंदरवाडी महोत्सवात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांनी कलाकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ कलंबिस्त येथून सुरू झालेले साखळी उपोषण सावरवाड येथे करण्यात आले. यावेळीही ग्रामस्थांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्यावतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी ग्रामस्थांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याचे आवाहन केले. याला परब यांनीही पाठिंबा दिला आहे.

पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन साखळी उपोषण स्थगित ठेवण्याचे आवाहन केले.
सावंतवाडी : सुंदरवाडी महोत्सवात सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांनी कलाकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ कलंबिस्त येथून सुरू झालेले साखळी उपोषण सावरवाड येथे करण्यात आले. यावेळीही ग्रामस्थांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेर सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्यावतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी ग्रामस्थांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवण्याचे आवाहन केले. याला परब यांनीही पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र स्वाभिमानच्यावतीने आयोजित केलेल्या सुंदरवाडी महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांना सावंतवाडी पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये कलाकार उतरले होते तेथे तपासणीच्यावेळी अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांची बदली करावी, तोपर्यंत आम्ही प्रत्येक गावात साखळी उपोषणे करणार, असा इशारा स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला होता.
१० मार्चला कलंबिस्त येथे, तर सावरवाड येथे रविवारी उपोषण करण्यात आले. या उपोषणात तालुकाध्यक्ष संजू परब यांच्यासह सभापती रवींद्र मडगावकर, गुरू मठकर, किरण सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, अंतोन रॉड्रिक्स आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या समितीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत पोलीस अधीक्षकांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे उपअधीक्षकांच्यावतीने आम्ही आलो असून, चौकशी होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवा, असे अवाहन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी केले. त्यानंतर उपोषणकर्त्यांसह संजू परब यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढील कारवाई होईपर्यंत उपोषण स्थगित ठेवत असल्याचे जाहीर केले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासोबत पोलीस कर्मचारी दाजी सावंत, अमोद सरगले आदी उपस्थित होते.
सावरवाड येथील उपोषणात पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी
यावेळी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिलांची संख्या मोठी होती. सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह पोलीस सावरवाड येथे दाखल झाले. त्यांनी उपोषणस्थळी जाऊन तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांची चौकशी समिती नेमली आहे.