सिंधुुदुर्ग : पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, बांदा येथील आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:33 PM2018-03-19T14:33:03+5:302018-03-19T14:33:03+5:30
माकडतापाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.
सिंधुुदुर्ग : माकडतापाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापबाधित रुग्ण व मृत माकडे सापडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत.
माकडतापाच्या साथीमुळे प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दुसऱ्यावर न ढकलता चोखपणे पार पाडावी. निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे संकेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी वनविभाग व पशुसंवर्धन विभागाच्या कामाबाबत पालकमंत्री केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
माकडताप बाधित क्षेत्रातील गावांमध्ये २४ तास वनखात्याने पथके कार्यरत ठेवावीत. आरोग्य विभागानेही प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार करुन योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या.
यावेळी केसरकर यांनी माकडतापाने बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बांदा आरोग्यकेंद्राचे उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माकडतापाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, दोडामार्ग तहसीलदार रोहिणी राजपूत, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, दोडामार्ग शिवसेना तालुुकाप्रमुख बाबुराव धुरी, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सुशांत पांगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदींसह वनविभाग, आरोग्य विभाग, पशुधन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली करणार : दीपक केसरकर
बांदा परिसरात माकडतापासारखी गंभीर परिस्थिती असताना जिल्ह्यातील आरोग्य, वनविभाग आणि संबंधित कोणत्याच विभागाचा मुख्य अधिकारी त्या गावापर्यंत पोहोचला नसल्याने पालकमंत्री केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या जिल्ह्यात काम करतो त्याबाबत आत्मीयता असली पाहिजे.
सर्वांगीण विकास होण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य अधिकारी चांगले असणे गरजेचे आहे. मात्र या अधिकाºयांना त्याची फिकीर नसल्याने लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करून त्याजागी चांगले अधिकारी बसविणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.