सिंधुदुर्ग : बाजारपेठेतील अतिक्रमणांवर हातोडा, मालवण पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:42 PM2018-03-15T15:42:56+5:302018-03-15T15:42:56+5:30
मालवण नगरपालिकेने बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर बुधवारी दुपारी बाजारपेठ अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. यात बाजारपेठेतील तीन अतिक्रमणांवर हातोडा उगारण्यात आला. यावेळी पालिकेचे कारवाई पथक प्रमुख विशाल होडावडेकर व कारवाई केलेल्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.
मालवण : नगरपालिकेने बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर बुधवारी दुपारी बाजारपेठ अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. यात बाजारपेठेतील तीन अतिक्रमणांवर हातोडा उगारण्यात आला. यावेळी पालिकेचे कारवाई पथक प्रमुख विशाल होडावडेकर व कारवाई केलेल्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.
जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या ताब्यातील अतिक्रमणे हटविण्यात आली. शहरातील अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
मालवण बाजारपेठ व शहरातील अंतर्गत रस्त्यांवर व्यापारी तसेच नागरिकांनी नव्याने इमारती बांधल्याने पालिकेच्यावतीने रस्ता रुंदीकरणासाठी सोडण्यात आलेली जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
शहरातील २३ इमारतींच्या ठिकाणी रुंदीकरणाची हद्द निश्चित करण्यात आली असून अतिक्रमणे हटविण्याच्या नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार बाजारपेठेतील मोहिनी देसाई यांच्या बांधकामातील शंकर गारमेंट्स या दुकानाची शेड, डॉ. शशिकांत झांट्ये यांच्या अंकुर बालरुग्णालयासमोरील व दिलीप अच्युत माळगावकर यांनी गटारावर केलेले अतिक्रमण पालिकेच्यावतीने जेसीबी व कामगारांच्या सहाय्याने हटविण्यात आले.
पार्श्वनाथ दत्ताराम गरगटे यांनी रस्ता रुंदीकरणाच्या जागेत घातलेल्या लाद्या स्वत:हून हटविल्या. बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून हटविण्याची तयारी दर्शविली असून ती हटविली न गेल्यास मंगळवार २० मार्चपासून पुन्हा धडक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे होडावडेकर यांनी स्पष्ट केले.
या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकात नगरपालिकेचे नगर अभियंता व अतिक्रमण हटाव मोहिमेचे प्रमुख विशाल होडावडेकर, विजय रावले, हेमंत आचरेकर, शशिकांत देऊलकर, रमेश कोकरे, बस्त्याव फर्नांडिस, महेश पाटील तसेच सफाई कामगार सहभागी झाले होते.
कारवाई दरम्यान जागामालक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही घडले. शंकर गारमेंट्सची शेड हटविण्यासाठी जेसीबी वापरण्यावरून जागा मालकांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ज्या गोष्टी कामगारांच्या मदतीने काढणे शक्य आहे त्यासाठी जेसीबी कशाला?
जेसीबीमुळे बांधकामास धोका पोहोचल्यास पालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा यावेळी जागा मालकांनी दिला. यावरून काहीवेळ बाचाबाची झाल्यावर सरतेशेवटी कामगारांच्या मदतीने ही शेड काढण्यात आली. अधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबतही व्यापारी व जागामालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
२0 पासून पुन्हा कारवाई
पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी तीन अतिक्रमणे हटविल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी व जागा मालकांनी स्वत:हून अतिक्रमणे हटविण्याची तयारी दर्शविली आहे, असे नगर अभियंता विशाल होडावडेकर यांनी सांगताना पुढील दोन अन्य ठिकाणी पदभार सांभाळायचा असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम कारवाई मंगळवार २० मार्चपासून पुन्हा हाती घेण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले.