सिंधुदुर्ग :तापसरीची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभाग अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:13 PM2018-09-26T14:13:08+5:302018-09-26T14:15:45+5:30
सावंतवाडी तालुक्यात तापसरीची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असून उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला दीडशे रुग्णांची दररोज तपासणी होत आहे.
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात तापसरीची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असून उपजिल्हा रुग्णालयात दिवसाला दीडशे रुग्णांची दररोज तपासणी होत आहे. यात पाच ते सहा रुग्ण टायफॉईड तापाचे मिळत असल्याचे येथील रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आरोग्याच्या बाबतीत प्रशासनाकडून खेळखंडोबा मांडण्यात आला असून फक्त दोन डॉक्टरांवर येथील उपजिल्हा रुग्णालयाची मदार आहे. याशिवाय आवश्यक असलेला औषध साठाही रुग्णालयात नाही. लोकप्रतिनिधी असो अथवा पालकमंत्री, सर्वांचेच याकडे दुर्लक्ष होत असल्याने खंत व्यक्त होत आहे.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत तापसरीने डोके वर काढले आहे. यात साथीच्या तापाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. तसेच सर्दी, खोकला आदी आजारांनीही त्रस्त असलेले रुग्ण उपचाराकरिता रुग्णालयात धाव घेत आहेत.
सद्यस्थितीत डॉ. सागर जाधव हे बाह्यरुग्ण विभाग सांभाळत आहेत. दिवसाला दीडशे रुग्णांची तपासणी सध्या या रुग्णालयात होत आहे. टायफॉईड तापाची लक्षणे असलेले रुग्णही दिवसाला पाच ते सहा आढळून येत आहेत. रुग्णालयाची सारी भिस्त सद्यस्थितीत डॉ. उदय चितारी व डॉ. सागर जाधव यांच्यावरच आहे. त्यामुळे बारा ते चोवीस तास ड्युटी केल्यानंतर नंतर रुग्णालयात डॉक्टरांची ओरड पडते. डॉ. संदीप सावंत व डॉ. मुरली चव्हाण हे सुद्धा चांगल्या प्रकारे रुग्ण हाताळत असतात.
कामाचा ताण पडत असतानाही डॉक्टर रुग्ण सेवेत कुठलीच कसर सोडत नाहीत. दुसरीकडे तापसरीची साथ असताना रुग्णालयाच्या औषध विभागात आवश्यक औषध पुरवठा उपलब्ध नाही. टायफॉईड तापासाठी लागणारे औषध नसल्याने सध्या पर्यायी दुसरा डोस रुग्णांना द्यावा लागतो.
ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या प्रकाराबाबत कोणालाच त्याची चिंता नाही. सगळे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देत आहेत. मात्र, तापसरीची साथ आटोक्यात येत नाही.
गंभीर रुग्ण तपासायला डॉक्टरच नाहीत
येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी गंभीर रुग्ण तपासायला डॉक्टरच नसल्याचे दिसून आले. बालरोगतज्ज्ञ असलेले डॉ. संदीप सावंत व डॉ. सागर जाधव हे ड्युटीवर होते. डॉ. जाधव हे बाह्य रुग्ण विभाग सांभाळत असल्याने गंभीर रुग्णांना परिचारिकेकडून प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येत होता. त्यामुळे येथील रुग्णालयाची वाईट स्थिती पहायला मिळाली.