सिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराचे १५ डंपर अडविले, खड्डे भरून देण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:19 PM2018-06-26T16:19:28+5:302018-06-26T16:23:34+5:30
खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर रस्त्याची दुर्दशा झाल्याने तिथवलीच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास महामागार्चे ठेकेदार केसीसी बिल्डकॉन कंपनीचे १५ डंपर अडविले होते.
वैभववाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तिथवलीतून खडी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे तिथवलीच्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास महामागार्चे ठेकेदार केसीसी बिल्डकॉन कंपनीचे १५ डंपर अडविले होते.
कंपनीच्या अधिकाऱ्यांना समज दिल्यावर खड्डे भरून देण्याचे तसेच प्रमुख अधिकाऱ्याशी बैठक करण्याचे आश्वासन दिल्यावर अडविलेले डंपर सोडण्यात आले.
केसीसी बिल्डकॉन कंपनीची तिथवलीत स्टोन क्रशर असून तेथून महामार्गाच्या कामासाठी मोठ्या डंपरने खडी वाहतूक होते. पावसाळ्यामुळे तालुक्यातील अन्य क्रशर बंद आहेत. मात्र केसीसी बिल्डकॉनची क्रशर सुरू आहे.
अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे खारेपाटण-गगनबावडा राज्य महामागार्ची तिथवलीपर्यंत खड्ड्यांमुळे दुर्दशा झाल्याने छोटे वाहनधारक व नागरिकांना त्रास होत आहे.
त्यामुळे सोमवारी सकाळी तिथवलीच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर १५ डंपर अडविले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती बाळा हरयाण, सरपंच सुरेश हरयाण, सोसायटीचे अध्यक्ष ब्रह्मानंद हरयाण, महादेव हरयाण, रमेश हरयाण व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळी ८ पासून डंपर अडवून ठेवल्यामुळे १०.३० च्या सुमारास केसीसी बिल्डकॉन कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी तिथवलीतील ग्रामस्थांशी संपर्क साधला. त्यांनी आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करून देतो. तसेच कंपनीचे प्रमुख अधिकारी सध्या कोलकत्त्याला असून ते आल्यावर त्यांच्याशी बैठक करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे साडेअकराच्या सुमारास अडविलेले डंपर सोडून देण्यात आले.
लोकांचा विचार करा
सरपंच सुरेश हरयाण यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, विकासकामाला आमचा अजिबात विरोध नाही. परंतु कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे जनतेला त्रास होतो. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कंपनीने लोकांचा विचार केला पाहिजे. त्यासाठीच आम्हांला हे पाऊल उचलणे भाग पडले. कंपनीकडून आश्वासन पूर्ण होईल या विश्वासाने आम्ही वाहने सोडली.