सिंधुदुर्ग :  महामार्ग ठेकेदाराचे डंपर माघारी पाठविले, तिथवली येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:56 PM2018-06-28T16:56:53+5:302018-06-28T16:59:10+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तिथवली येथील क्रशरवर खडी भरण्यास निघालेले ह्यकेसीसी बिल्डकॉनह्णचे १५ डंपर अडवून बुधवारी तिथवली ग्रामस्थांनी परत पाठविले.

Sindhudurg: The highway contractor sent the dumper back, type in the area | सिंधुदुर्ग :  महामार्ग ठेकेदाराचे डंपर माघारी पाठविले, तिथवली येथील प्रकार

डंपर वाहतुकीमुळे खारेपाटण ते तिथवलीपर्यंत खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Next
ठळक मुद्दे महामार्ग ठेकेदाराचे डंपर माघारी पाठविले, तिथवली येथील प्रकार खडी भरण्यासाठी आले होते १५ डंपर; ५ जुलैला खास ग्रामसभेचे आयोजन

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तिथवली येथील क्रशरवर खडी भरण्यास निघालेले केसीसी बिल्डकॉनचे १५ डंपर अडवून बुधवारी तिथवली ग्रामस्थांनी परत पाठविले.

अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत वाहतूक न करण्याचा इशारा ग्रामस्थांनी बिल्डकॉनच्या डंपर चालकांना दिला. दरम्यान, खारेपाटण तिथवली मार्गावरील अवजड वाहतुकीबाबत निर्णय घेण्यासाठी ५ जुलैला खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.

महामार्ग चौपदरीकरणाच्या ठेकेदाराचा तिथवली येथे स्टोन क्रशर आहे. तेथून चौपदरीकरणासाठी खडी वाहतूक केली जाते. या अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्गावरील तिथवलीपर्यंत रस्ता तीन ठिकाणी खचला असून रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे तिथवलीतील ग्रामस्थांनी कंपनीचे खडी भरलेले १५ डंपर सोमवारी रोखले होते. त्यामुळे कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बाहेर असून ते आल्यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे मान्य केल्याने अडविलेले डंपर ग्रामस्थांनी सोडले होते.

तिथवली ग्रामस्थांच्या दणक्यानंतर मंगळवारी दिवसभर वाहतूक बंद होती. बुधवारी सकाळी पुन्हा कासार्डेहून क्रशरवर खडी भरण्यासाठी १५ डंपर जात होते. ही बाब लक्षात येताच तिथवलीच्या ग्रामस्थांनी तत्काळ ते डंपर ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबविले.

जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचा ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत खारेपाटण-गगनबावडा मार्गावर अवजड वाहतूक न करण्याची तंबी ग्रामस्थांनी डंपर चालकांना दिली. त्यामुळे क्रशरवर निघालेले ते १५ डंपर रिकामेच माघारी परतले. अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण ते तिथवली मार्गाची दुरवस्था झाल्याने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय केल्याशिवाय पुन्हा डंपर वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास कंपनी आणि ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाहतुकीसंदर्भात ग्रामसभेत निर्णय : हरयाण

कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे खारेपाटण-तिथवली मार्गाची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुचाकी, रिक्षा व अन्य छोट्या वाहनांना त्रास होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या अवजड वाहतुकीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन त्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी ५ जुलैला खास ग्रामसभा आयोजित केली जाणार आहे, असे तिथवली सरपंच सुरेश हरयाण यांनी सांगितले.
 

Web Title: Sindhudurg: The highway contractor sent the dumper back, type in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.