सिंधुदुर्ग : कलाकार थांबलेल्या हॉटेलवर छापे कसे ? : नारायण राणेंचा प्रश्न, पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:57 AM2018-02-28T11:57:53+5:302018-02-28T11:57:53+5:30

गोव्यातील आरोपीला शोधायचे होते, तर ज्या हॉटेलमध्ये कलाकार थांबले होते त्याच हॉटेलवर छापे कसे काय टाकले ? या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष गप्प बसणार नाही. दोषी पोलिसांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. एवढीच खुमखुमी असेल, तर सीमारेषेवर जाऊन लढा. कुणाच्या तरी सांगण्यावरून आमच्या नादाला लागू नका, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिले.

Sindhudurg: How to Raise Artists Stop Hotel? : The question of Narayan Rane, a hint of agitation against police | सिंधुदुर्ग : कलाकार थांबलेल्या हॉटेलवर छापे कसे ? : नारायण राणेंचा प्रश्न, पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

सुंदरवाडी महोत्सवाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आयोजक संजू परब यांचा सत्कार केला. यावेळी निलेश राणे, दत्ता सामंत, नीलम राणे, रेश्मा सावंत, संजू परब आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकलाकार थांबलेल्या हॉटेलवर धाड कशी ? : नारायण राणेंचा प्रश्न पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी : गोव्यातील आरोपीला शोधायचे होते, तर ज्या हॉटेलमध्ये कलाकार थांबले होते त्याच हॉटेलवर छापे कसे काय टाकले ? या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष गप्प बसणार नाही. दोषी पोलिसांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. एवढीच खुमखुमी असेल, तर सीमारेषेवर जाऊन लढा. कुणाच्या तरी सांगण्यावरून आमच्या नादाला लागू नका, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिले.

ते सावंतवाडी येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या सुंदरवाडी महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, नीलम राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, गुरू मठकर, राजू बेग, मंदार नार्वेकर, रवींद्र मडगावकर, विशाल परब आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री राणे म्हणाले, मी मंत्री असताना विकासात कधीच मागे नव्हतो. पण आज परिस्थिती बदलली आहे. विमानतळ, सी-वर्ल्ड, दोडामार्ग एमआयडीसी, ओरोस आयटी पार्क आदी प्रकल्प बंद आहेत. मी काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत दिल्ली येथे गेलो व तेव्हाचे मंत्री सी. पी. जोशी यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्ग मंजूर करून आणला.

आताच्या सरकारने फक्त निविदा काढण्याचे काम केले आहे. सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री विधानसभेत बोलण्यास उभे राहिले तरी बाकीचे सदस्य हसतात. मग अशा माणसाकडून कोणती अपेक्षा करणार, असा सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

सिंधुदुर्गमध्ये मोठमोठे कलाकार येतात, पण त्यांना जर पोलीस त्रास देत असतील तर ते योग्य नाही. ते कोणाच्या सांगण्यावरून त्रास देत आहेत ते सर्वांना माहीत आहे. पण पोलिसांना एवढी खुमखुमी दाखवायची असेल तर सीमारेषेवर जावे आणि तेथे लढावे.

गोव्यातून पळालेला आरोपी हा कलाकार राहिलेल्या हॉटेलमध्येच लपला होता का? तेथे सर्व कलाकार आहेत. त्यांची तपासणी केली. यावेळी तुमच्यासोबत महिला पोलीस होत्या का, याची चौकशी झाली पाहिजे आणि याचे पोलीस अधीक्षकांनी लवकरच उत्तर द्यावे.

रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाविरोधात जसे आंदोलन केले, त्यानंतर मालवण मच्छिमार प्रश्नावर आंदोलन केले, तसे आता आम्हांला सावंतवाडीत येऊन पोलिसांविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. स्वाभिमान पक्षाने आता शांत बसू नये. पोलीस जर मुद्दाम त्रास देत असतील, तर त्याच भाषेत उत्तर द्यावे. संजू परब तुम्ही राणेंचा कार्यकर्ता असल्याचे दाखवून द्या. कुणामुळे कार्यक्रम बंद करू नका, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत म्हणाले, जिथे लक्ष्मी नांदते तेथे अवदसाही येणारच, असे सांगत मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली. माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडीप्रमाणे मालवणात भव्य-दिव्य कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन केले. राणे यांच्यामुळे मच्छिमारांचा प्रश्न सुटला आहे. येथील आमदार, खासदार कुठे दिसत नाहीत, अशी टीकाही यावेळी केली.

तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता टीका केली. ज्या हॉटेलमध्ये कलाकार थांबले होते त्या हॉटेलवर पोलिसांनी छापे टाकले ? हे योग्य नाही. हा बाहेरून आलेल्या पाहुण्या कलाकारांचा अपमान आहे. भविष्यात मोठे कार्यक्रम घ्यायचे की नाहीत याचा विचार करू, असे सांगत पोलिसांनी केले ते योग्य नाही. याचा जाब विचारला जाईल, असा इशारा यावेळी परब यांनी दिला.

प्रास्ताविक ऋषी देसाई यांनी केले तर आभार केतन आजगावकर यांनी मानले. यावेळी माजी सभापती प्रियंका गावडे, जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, नगरसेविका समृद्धी विरनोडकर, दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, दिलीप भालेकर, किरण सावंत, सत्यवान बांदेकर, संदेश पटेल आदी उपस्थित होते.

संजू परब यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकौशल्याचे तोंड भरून कौतुक केले. परब यांच्या सर्व सहकाºयांनी एकत्र येऊन हा उत्कृष्ट महोत्सव साजरा केला आहे. असेच काम करा. माझी तुम्हांला साथ असेल, असे सांगत संजू परब यांचा राणे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

विविध मान्यवरांचा सत्कार

सुंदरवाडी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जगदीश पाटील, डॉ. विष्णू चिपळूणकर, बाबुराव कविटकर, सांगेली येथील टीम बाबल आल्मेडा, डॉ. अमृता स्वार, संजय वरेरकर, दिनेश जाधव, संजू विरनोडकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

 

Web Title: Sindhudurg: How to Raise Artists Stop Hotel? : The question of Narayan Rane, a hint of agitation against police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.