सिंधुदुर्ग : स्वतंत्र कोकण विद्यापीठ न झाल्यास आंदोलन : महेंद्र नाटेकर यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 02:08 PM2018-10-23T14:08:01+5:302018-10-23T14:11:07+5:30
रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल.असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.
कणकवली : सुमारे सात लाख विद्यार्थी असलेल्या मुंबई विद्यापीठात अनागोंदी कारभार चालला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकणविद्यापीठ स्थापन करण्यात यावे. येत्या दोन महिन्यात याबाबत कार्यवाही नाही झाली तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांसह स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना मुंबई - गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रा. महेंद्र नाटेकर यांनी शासनाला दिला आहे.
याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथील स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेच्या कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते.
यावेळी मोतीराम गोठिवरेकर, ए.आय.चिलवान, प्रा.सुभाष गोवेकर, दिलीप लाड, जे.जे.दळवी , वाय. जी.राणे, रमेश सावंत आदी उपस्थित होते.
प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, मुंबई विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रिका हजारो रूपये घेऊन विकल्या जात आहेत. विद्यापीठाच्या बेजबाबदार कारभारामुळे लाखो विद्यार्थ्याना अकारण अनुतीर्ण केले जात आहे.
बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचा घोटाळा गाजत असताना केटी लागलेल्या एका विद्यार्थिनीची दीड वर्ष उत्तरपत्रिका न तपासल्याने तीने सर्वोच्च न्यायालयात विद्यापीठाला खेचले आहे. ही गंभीर बाब आहे.
कोकणा बरोबरच संपूर्ण भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतात. फोर्ट, कालिना व रत्नागिरी अशी तिन केंद्रे आहेत. हा सर्व व्याप एका कुलगुरुने सांभाळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे भ्रष्टाचार फोफावला आहे. रत्नागिरी येथील उपकेंद्रात चाळीस विद्यार्थ्यांना एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या सही , शिक्क्यानिशी काही हजारात गुणपत्रिका विकल्याचे समोर आले आहे.
त्यातील सहा जणाना अटक करण्यात आली. दरवर्षी परीक्षेच्या वेळापत्रकात घोळ घातलेला असतो. प्रश्न पत्रिकेत असंख्य चुका असतात. मूल्य मापनाबरोबरच पुनर्मूल्यमापनात चुका असतात. निकाल वेळच्या वेळी लागत नाहीत. यावर्षी अनेक विद्यार्थी चुकून नापास केल्याचे समोर आले आहे. हा विद्यार्थ्यांच्या जीवनाशीच खेळ आहे. ही सर्व भयावह परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ निर्मिती करण्याचा निर्णय त्वरीत जाहिर करावा. तसेच त्याची कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असेही प्रा. नाटेकर यांनी यावेळी जाहिर केले. इतर उपस्थित सदस्यानी त्याला दुजोरा दिला. तसेच आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. असेही या पत्रकात म्हटले आहे.