सिंधुदुर्ग : हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी मालवणमध्ये मच्छिमार बैठक घ्यावी : उपरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:33 PM2018-09-22T17:33:03+5:302018-09-22T17:35:13+5:30
परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे.
सिंधुदुर्ग : काँग्रेस आघाडी आणि आताच्या युती सरकारने मच्छिमारांचा केवळ मतांसाठी उपयोग करून घेतला. मच्छिमारांचे प्रश्न या दोन्ही सत्ताधाऱ्यांना सोडविण्यात अपयश आले आहे. मत्स्य विभागात ३२ कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे.
कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, समुद्र किनारी परराज्यातील मच्छिमार येऊन मासेमारी करतात. ती मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य आयुक्तांकडे एकच गस्ती नौका आहे. परप्रांतीय येऊन माशांची लयलूट करत आहेत. १२ नॉटिकल नौका नसल्याने कारवाई करता येत नाही़.
मच्छिमारांसाठी कॉरीडॉर करण्याची घोषणा सरकारने केली़ परंतु अद्यापही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही़ पारंपरीक मच्छिमारांना आर्थिक अडचणीत आणण्याचे काम हे सरकार करत आहे़ कर्जावर घेतलेल्या बोटी व केलेले गुंतवणूकीमुळे मच्छिमार अडचणित आहे़ त्यामुळे बोटी ताब्यात घेऊन मच्छिमारांना कर्जमुक्त करावे आणि मच्छिमारांना सरकारने समाधानाने व्यवयाय मुक्त करावे, असा टोला परशुराम उपरकर यांनी लगावला.
विमानाने चाकरमानी केव्हा येणार?
जुन्या पालकमंत्र्यांनी विमानतळाचे तीन वेळा नारळ फाडले़ या पालकमंत्र्यांनी पुन्हा १२ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे येणार असल्याचे जाहीर केले. परंतु या विमानतळावर चाकरमानी केव्हा येणार? हे पालकमंत्र्यांनी सांगितले नाही़ नारायण राणे यांनी विमानतळाच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.
पहिला गुन्हा त्या कंपनीवर होणार आहे आणि पालकमंत्र्यांना जर अधिकार नसतील तर त्यावेळी राणे पालकमंत्री असताना सीवर्ल्ड आणि औष्णिक उर्जा प्रकल्पात तडीपारीची भाषा का करत होते ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित केला.
वैभव नाईक यांनी मच्छिमारांचे प्रश्न सोडविले असे सांगत सत्कार स्विकारले. पण प्रत्यक्षात मच्छिमारांची निराशा झाली आहे.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.