सिंधुदुर्ग : युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू, चौकुळमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:55 PM2018-05-17T18:55:01+5:302018-05-17T18:55:01+5:30
चौकुळ-माळवाडी येथील पापडीचे पूल येथे आपले मित्र व वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या साई शंकर गावडे (१८, मूळ रा. चौकुळ-गावडेवाडी) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आंबोली : चौकुळ-माळवाडी येथील पापडीचे पूल येथे आपले मित्र व वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या साई शंकर गावडे (१८, मूळ रा. चौकुळ-गावडेवाडी) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
साई हा आपले वडील शंकर गावडे, भाऊ सोनू गावडे, रुपेश गावडे यांच्यासमवेत मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास माळवाडी पापडी पूल येथे मासे पकडण्यासाठी गेला होता. त्यावेळी अंधार पडू लागला होता.
साई हा जाळे घेऊन पाण्यात उतरला, तर त्याचे भाऊ आणि वडील वरच राहिले. पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ््या खाऊ लागला आणि पाण्यात बुडाला. भाऊ आणि वडिलांनी आरडाओरड करीत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
पोलीस पाटील प्रशांत गावडे यांनी याबाबत साडेसात वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस दूरक्षेत्रात माहिती दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधारामुळे शोधमोहिमेत व्यत्यय येत असल्याने मोहीम थांबविण्यात आली होती.
बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम हाती घेण्यात आली. सकाळी सातच्या सुमारास साई याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
वडिलांची कोल्हापुरात वडापावची गाडी
साई हा चौकुळ-गावडेवाडी येथील असून, त्याच्या वडिलांची कोल्हापूर येथे वडापावची गाडी आहे. तो आपल्या वडिलांसोबत तेथेच राहत होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली होती. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्यकेंद्र्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत हे करीत आहेत.