राजकारणात सिंधुदुर्गच रत्नागिरीपेक्षा वरचढ!, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँटे की टक्कर
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 30, 2024 05:27 PM2024-04-30T17:27:08+5:302024-04-30T17:28:56+5:30
आतापर्यंतच्या तिन्ही निवडणुकांचा विचार करता तिन्ही वेळा सिंधुदुर्गमधीलच उमेदवारांमध्ये लढत
महेश सरनाईक
सन २००९ मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या लोकसभेच्या (क्रमांक ४६) या तळकोकणातील महत्त्वाच्या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत या मतदारसंघात तीन वेळा मतदान झाले असून, चौथ्यांदा खासदार निवडण्यासाठी सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
आतापर्यंतच्या तिन्ही निवडणुकांचा विचार करता तिन्ही वेळा सिंधुदुर्गमधीलच उमेदवारांमध्ये ही लढत झाली असून, रत्नागिरीत जास्त मतदान असतानाही राजकीय लढाईत सिंधुदुर्गने रत्नागिरीला मागे टाकल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणात सध्या या एका वेगळ्याच मुद्द्यावर सर्वत्र राजकीय चर्चा होताना आढळत आहे. रत्नागिरी असो वा सिंधुदुर्ग शेवटी कोकणच. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊनच सिंधुदुर्गची निर्मिती झाली आहे. त्यामुळे असा मतभेद करण्यात काहीच अर्थ नाही, असे प्रत्युत्तर चर्चा करणाऱ्यांना दिले जात आहे.
सन २००९मध्ये पहिल्या निवडणुकीत शिवसेनेकडून त्यापूर्वी सलग चार निवडणुका जिंकलेले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याविरोधात त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक लढविली होती. हे दोन्ही उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच होते. यात नीलेश राणेंनी बाजी मारत येथे काँग्रेसला यश मिळवून दिले होते.
दुसऱ्या म्हणजे २०१४ आणि तिसऱ्या २०१९च्या निवडणुकांमध्ये विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेकडून बाजी मारत माजी खासदार नीलेश राणे यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव केला होता. २०१४ मध्ये राणे काँग्रेसकडून, तर २०१९ मध्ये स्वाभिमान पक्षाकडून लढले होते. परंतु, राणे आणि राऊत हे दोघेही सिंधुदुर्गचे सुपुत्र असल्याने ही राजकीय लढाई पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन भूमिपुत्रांमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.
आता लोकसभेची चौथी निवडणूक होत आहे. परंतु, यावेळीही राऊत आणि राणे या दोन्ही सिंधुदुर्ग सुपुत्रांमध्ये राजकीय सामना होणार आहे. फक्त यावेळी नीलेश यांच्याऐवजी नारायण राणे आहेत. शिंदेसेना की भाजप, राणे की सामंत आणि रत्नागिरी की सिंधुदुर्ग असे प्रश्न उमेदवारी जाहीर होईपर्यंत सातत्याने सर्वांनाच पडत होते. परंतु, ज्यावेळी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. आता राणे निवडून येवो किंवा राऊत, शेवटी सलग चौथ्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच सुपुत्राला खासदार होण्याचा मान मिळणार आहे.