सिंधुदुर्ग : आशा स्वयंसेविकांचे जेलभरो आंदोलन, मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:39 PM2018-08-08T16:39:58+5:302018-08-08T16:43:22+5:30
घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो आशा स्वयंसेविकांनी ओरोस फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखत जेलभरो आंदोलन छेडले. यावेळी पाच मिनिटे महामार्ग रोखून धरण्यात आला होता. दरम्यान, शेकडो आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
सिंधुदुर्गनगरी : चले जाव-चले जाव, मोदी-फडणवीस सरकार चले जाव, असल्या सरकारचे करणार काय, खाली डोके वर पाय, एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, वेतन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, सिंधुदुर्ग आशा वर्कर्स युनियनचा विजय असो अशा घोषणा देत जिल्ह्यातील शेकडो आशा स्वयंसेविकांनी ओरोस फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखत जेलभरो आंदोलन छेडले. यावेळी पाच मिनिटे महामार्ग रोखून धरण्यात आला होता. दरम्यान, शेकडो आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, निधीत वाढ करा, आशांना व गटप्रवर्तकांना आरोग्यसेवेत आरोग्यसेविका म्हणून कायम करा, गटप्रवर्तकांना व आशांना दरमहा अठरा हजार रुपये वेतन द्या, शासकीय दवाखान्यांचे खासगीकरण धोरण तत्काळ बंद करा, शासकीय आरोग्य सेवा मजबूत करा या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन यांच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण ९ रोजी जिल्हाभर मराठा समाजाचे जेलभरो आंदोलन असल्याने युनियनने मंगळवारी जेलभरो केले. ओरोस फाटा येथील अश्वारूढ शिवाजी पुतळ्याजवळ जिल्ह्यातील शेकडोंनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
दुपारी १२ वाजल्यानंतर या उपस्थितांनी मुंबई-गोवा महामार्गावर ठिय्या मांडला. अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत पोलिसांच्या गाडीत कोंबले. दोन गाड्यांमधून या आंदोलकांना सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात नेले. उर्वरित महिलांनी चालत जात ओरोस पोलीस ठाणे गाठले. यावेळी महिलांनी दिलेल्या गगनभेदी घोषणा लक्षवेधी होत्या. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देण्यात आल्या.
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील यांनी या महिलांना महामार्गावर रास्तारोको करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक महिलांची आक्रमकता पाहून त्यांनी अटकाव केला नाही. अखेर रास्तारोको केल्यानंतर या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी संघटना अध्यक्षा अर्चना धुरी, सचिव विजयाराणी पाटील, खजिनदार नीलिमा लाड, सुभाष निकम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
शाब्दिक चकमक|
ओरोस फाटा येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आंदोलक महिला एकत्र जमल्या. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विविध घोषणा देत गटप्रवर्तक व आशा यांनी महामार्गाकडे कूच केली. महामार्ग रोखणार असे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्यांना फाट्यापाशी अडविले व आपण महामार्ग रोखू शकत नाही असे सांगितले.
तसे केल्यास गुन्हा दाखल करू असा इशारादेखील दिला. मात्र आक्रमक भूमिका धारण केलेल्या आशा व गटप्रवर्तकांनी कितीही गुन्हे दाखल करावेत. आपण महामार्ग रोखणारच, अशी भूमिका घेत महामार्गावर ठिय्या केला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.