सिंधुदुर्ग : काका कुडाळकरांसह तीन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भाजपाकडून कोंडी होत असल्याचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:40 PM2018-07-20T15:40:23+5:302018-07-20T15:48:05+5:30
भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवक्ते काका कुडाळकर यांच्यासहीत कुडाळ तालुक्यातील भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सातत्याने कोंडी होत असल्याच्या कारणातून हे राजीनामे दिले असल्याची चर्चा आहे.
कुडाळ : भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवक्ते काका कुडाळकर यांच्यासहीत कुडाळ तालुक्यातील भाजपाच्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. भाजपाकडून सातत्याने कोंडी होत असल्याच्या कारणातून हे राजीनामे दिले असल्याची चर्चा आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक असलेल्या काका कुडाळकर यांनी राणेंची साथ सोडत माजी आमदार राजन तेली यांच्यासमवेत भाजपात प्रवेश केला होता. कुडाळकर यांनी भाजपात आपल्या काही समर्थकांनाही आणले होते. कुडाळकर यांनी भाजपात येताच पक्ष संघटना वाढीसाठी जोमाने काम करायला सुरुवात केली होती.
विविध उपक्रम, कार्यक्रमही राबविले होते. मात्र त्यांना भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांकडून डावलण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे त्यांची कोंडी होत असल्याने भाजपात त्यांची घुसमट होत होती. गेल्या काही महिन्यांपासून तर त्यांना पक्षाच्या बैठकीत, कार्यक्रमाच्यावेळी मानसन्मानापासून दूर ठेवले जात होते. याची ठिणगी आमदार निरंजन डावखरे यांच्या सत्कार कार्यक्रमाच्यावेळी पडली.
कुडाळ तालुका भाजपाच्यावतीने हा कार्यक्रम असतानाही त्यांना बोलू दिले नव्हते. त्यामुळे याबाबत त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. राजन तेली यांनाही त्यांनी याबाबत आपली नाराजी बोलून दाखविली होती.
या दरम्यान भाजपात घुसमट होत असलेल्या कुडाळकर व त्यांचे समर्थक व भाजपाचे पदाधिकारी सदानंद अणावकर, सर्फराज नाईक, प्रशांत राणे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे पाठविला आहे.