सिंधुदुर्ग : 'कणकवली पर्यटन महोत्सव' ३१ जानेवारी पासून, ३ फेब्रुवारी रोजी समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:10 PM2018-12-26T16:10:37+5:302018-12-26T16:15:28+5:30
कणकवली येथील नगरपंचायतीच्यावतीने कणकवली पर्यटन महोत्सव ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
कणकवली : येथील नगरपंचायतीच्यावतीने कणकवली पर्यटन महोत्सव ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत फुड फेस्टिव्हल, फॅशन शो, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होणार असून हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत आणि नामवंत गायक-गायिकांची मांदियाळीच यानिमित्ताने कणकवलीत दाखल होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, विराज भोसले, माजी नगरसेवक किशोर राणे , राजू गवाणकर आदी उपस्थित होते.
समीर नलावडे म्हणाले , या कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने ३१ जानेवारी रोजी फ़ूड फेस्टिव्हल होणार असून त्याचे उदघाट्न शहरातील प्रतिष्ठित नागरिक करतील. याच दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात येईल. तर १ फेब्रुवारी रोजी पर्यटन महोत्सवाचे उदघाट्न माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होईल .
त्यापूर्वी शहरातील प्रत्येक प्रभागातून एक असे १७ चित्ररथ तयार करण्यात येणार आहेत. त्यांची शोभायात्रा पटकीदेवी येथून महोत्सव स्थळापर्यन्त काढली जाणार आहे. सहभागी १७ चित्ररथाना प्रत्येकी रोख रूपये ५००० देण्यात येणार आहेत. तर चित्ररथ स्पर्धेत प्रथम क्रमांक १०,००० रूपये, द्वितीय ५००० रूपये तर तृतीय क्रमांकासाठी ३,००० रूपये अशी पारितोषिके प्रमाणपत्रासह दिली जातील. तसेच स्थानिक कलावंतांचाही साडे तीन तासांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम याच दिवशी होईल.
२ फेब्रुवारीला फॅशन शो रंगणार आहे. यावेळी पारितोषिक वितरण निलमताई राणे यांच्या हस्ते होईल. तर ३ फेब्रुवारीला महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे , आमदार नीतेश राणे तसेच अन्य मान्यवर उपस्थित रहातील.
या दिवशी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंताच्या उपस्थितीत ऑकेस्ट्रा व इतर कार्यक्रम होणार आहेत. याखेरीज पाककला स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा व इतर कार्यक्रमही होणार आहेत. त्याची प्रसिध्दि वेळोवेळी केली जाईल असे सांगतानाच कणकवली वासियानी आपल्या हक्काच्या या पर्यटन महोत्सवात बहुसंखेने सामिल होऊन आनंद द्विगुणित करावा. असे आवाहन समीर नलावडे यांनी यावेळी केले.
नगरपंचायत फंडातून पैसे वापरणार नाही !
या महोत्सवासाठी शहरातील कुणाकडूनही कसल्याच प्रकारची वर्गणी घेतली जाणार नाही. तसेच नगरपंचायतीच्या फंडातूनही एक रुपया वापरला जाणार नाही. आम्ही स्वखर्चाने तसेच आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून हा महोत्सव घेणार आहोत. शहरातील कोणाजवळ कोणीही महोत्सवासाठी वर्गणी अथवा पैसे मागत असेल तर थेट संबधितानी आपल्याशी संपर्क साधावा असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.
नवीन ब्रॅण्ड अम्बेसीडरची नियुक्ती !
कणकवली शहरात स्वच्छता सर्व्हेक्षण अभियानांतर्गत डॉ. विद्याधर तायशेट्ये व प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची नविन ब्रॅण्ड अम्बेसीडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहिर केले.