सिंधुदुर्ग : बाजारात पोलीस बंदोबस्त ठेवावा, वेंगुर्लेत चोऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:49 PM2018-09-04T14:49:46+5:302018-09-04T14:55:06+5:30
वेंगुर्ले येथील आठवडा बाजारात चोरीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शहरातील तसेच गावातून बाजारहाटीसाठी येणाऱ्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
वेंगुर्ले : येथील आठवडा बाजारात चोरीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शहरातील तसेच गावातून बाजारहाटीसाठी येणाऱ्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. वेंगुर्ले पोलिसांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करून पोलीस बंदोबस्त ठेवावा. अन्यथा, पालकमंत्र्यांकडे आवाज उठवू, असे लेखी निवेदन वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना दिले.
वेंगुर्ले शहरात दर रविवारी आठवडा बाजार भरला जातो. या दिवशी मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन गेल्या २ ते ३ महिन्यांत चोरी, पाकिटमारीचे प्रमाण वाढले आहे. बाजारासाठी गावातून, शहरातून येणाऱ्या महिला तसेच इतर नागरिक याला बळी पडत आहेत. पोलिसांनी कायद्याचा योग्य तो वापर करून त्यावर निर्णय घेऊन महिलांचे या त्रासापासून रक्षण करावे.
बाजाराच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा. गणेश चतुर्थी सण असल्याने शहरात असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून योग्य ती काळजी घ्यावी. अन्यथा याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आवाज उठवू, असा इशारा शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, जिल्हा परिषद माजी सदस्य सुकन्या नरसुले, महिला शहरप्रमुख मंजुषा आरोलकर, नगरसेविका सुमन निकम, उपशहरप्रमुख वृंदा मोरडेकर, दीप्ती धुरी, नयना पालकर, महेश्वरी रेडकर, प्रीती राऊळ, सुलोचना खानोलकर आदी उपस्थित होत्या.