सिंधुदुर्ग : खांबाळे आदिष्टीदेवी मंदिर जिर्णोध्दार वर्धापनदिन सोहळयात नृत्यसंगमने जिंकली रसिकांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 05:02 PM2018-04-21T17:02:21+5:302018-04-21T17:02:21+5:30
खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याची सांगता स्थानिक कलाकारांच्या नृत्यसंगमने झाली. गणेशवंदना, गवळण, घागरानृत्य, ठाकरनृत्य, लावणी, गोंधळ, दिंडी अशा पारंपारीक नृत्यांचे सादरीकरण करुन गावातील ८५ कलाकारांनी रसिकांची मने जिकंली. मंदिराची विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली.
वैभववाडी : खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याची सांगता स्थानिक कलाकारांच्या नृत्यसंगमने झाली. गणेशवंदना, गवळण, घागरानृत्य, ठाकरनृत्य, लावणी, गोंधळ, दिंडी अशा पारंपारीक नृत्यांचे सादरीकरण करुन गावातील ८५ कलाकारांनी रसिकांची मने जिकंली. मंदिराची विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली.
श्री देवी आदिष्टी मंदीर जिर्णोध्दाराचा १५ वा वर्धापनदिन १८ व १९ रोजी साजरा झाला. आदिशक्ती कलामंच निर्मित नृत्यसंगम या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली. गावातील ८५ कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात बालके, युवक-युवतींसह महिलांचा समावेश होता. त्यामुळे लोकांमध्ये कुतुहल होते.
गणेशवंदनाने या कार्यक्रमाला सुरूवात झाली आणि नृत्यांतील मनोरे, गवळण, किलबिल नृत्याने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. प्रेक्षकांनी टाळ्यांनी कार्यक्रमाला दाद दिली. त्यानंतर यल्लमा देवीच्या नृत्यासह एकाहून एक सरस नृत्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. संतोष टक्के यांच्या शैलीदार निवेदनाने नृत्यसंगम कार्यक्रम अधिक उठावदार झाला.
महिलांनी सादर केलेले पाळणा नृत्य आणि शिवराज्यभिषेक सोहळयानंतर शिवाजी महाराज की जय घोषणा देत रसिकांनी आसमंत दणाणून सोडला. घागरा नृत्य, मंगळागौर रसिकांना चांगलीच भावली.
मॉ तुझे सलाम या देशभक्तीपर गीतावरील नृत्याने वातावरण बदलून टाकले. महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली. गावातील लहान थोर कलाकारांना घेऊन आदिशक्ती कला मंचने निर्माण केलेल्या कार्यक्रमाचे नाट्यदिग्दर्शन प्रताप गायकवाड यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन देवस्थान समिती अध्यक्ष बबन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच लवू साळुंखे, आप्पा पवार, सूर्याजी पवार, संजय लोके, दीपक चव्हाण, प्रवीण गायकवाड, गुरूनाथ गुरव, लवु पवार, आनंद पवार, सुनील पवार, संजय साळुंखे, रामदास पवार, प्रमोद लोके आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रकाश सुतार, मारूती परब, प्रमोद गुरव, अशोक निग्रे, जानू पाटील, प्रताप गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
कलामंचमुळे संधी!
मंदिर जिर्णोध्दाराच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आदिशक्ती कला मंचाच्या माध्यमातून गावातील लहान थोर मंडळींना कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह होता.
'नृत्यसंगम' कार्यक्रमातील काही महिलांना निवेदक संतोष टक्केंनी बोलते केले. तेव्हा आम्ही आजवर कुटुंबासाठी जगलो. मात्र, गेला महिनाभर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही स्वत:साठी जगलो. आदिशक्ती कलामंचमुळे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली, अशा उत्स्फूर्त भावना सहभागी महिलांनी व्यक्त केल्या.