सिंधुदुर्ग : पतंग महोत्सव यादगार, केरळच्या पतंगांचे आकर्षण : स्थानिक छोट्या मुलांनी लुटला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 07:01 PM2018-02-13T19:01:55+5:302018-02-13T19:06:36+5:30
माझा वेंगुर्लातर्फे वेंगुर्ले नवाबाग-सागरेश्वरच्या विलोभनीय समुद्र् किनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी बीच पतंग महोत्सव यादगार ठरला. वन इंडिया काईट टिमच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महोत्सवात केरळचे भव्य असे विविधरंगी पतंग खास आकर्षण ठरले. महोत्सवात सहभागी होणाऱ्यांनाही पतंग उडविण्याची संधी मिळाल्याने स्थानिक बच्चेकंपनीबरोबरच अनेकांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला.
सिंधुदुर्ग : माझा वेंगुर्लातर्फे वेंगुर्ले नवाबाग-सागरेश्वरच्या विलोभनीय समुद्र् किनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी बीच पतंग महोत्सव यादगार ठरला. वन इंडिया काईट टिमच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महोत्सवात केरळचे भव्य असे विविधरंगी पतंग खास आकर्षण ठरले. महोत्सवात सहभागी होणाऱ्यांनाही पतंग उडविण्याची संधी मिळाल्याने स्थानिक बच्चेकंपनीबरोबरच अनेकांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला.
हजारो लोकांच्या उपस्थितीत रात्रीपर्यंत रंगत गेलेल्या या पतंग महोत्सवात किनाऱ्यावर घोड्यावरुन, उंटावरुन सैर करण्याची, समुद्रातील पॅरासिलींग, समुद्र्रात जेस्की राईट्स व नौकानयन करण्याची संधी आणि स्टॉलवरील विविध खाद्यपदार्थांची चव चाखता आल्याने सर्वांनाच महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटता आला.
नवाबाग किनारा झाला पतंगमय
पतंग महोत्सवात वन इंडिया काईट टिमकडून मोठ्या आकाराचे सुमारे २० ते ६० फुटापर्यंतचे वीस पतंग आकाशात उडविण्यात आले. यामध्ये कथ्थकली मुद्र्रा, दुर्गादेवी, गरुड, वटवाघूळ, पुष्पकविमान, ग्लोबल वार्मिंगसारख्या विविध पतंगांचा समावेश होता. विविध रंगांच्या आणि आकारांच्या असंख्य पतंगांनी संपूर्ण परिसर पतंगमय झाला होता.
पर्यटनाचा ध्यास वेंगुर्लेचा विकास या मुख्य उद्देशाने स्थापन झालेल्या माझा वेंगुर्ला ग्रुपने पर्यटनास चालना मिळावी म्हणून बीच पतंग महोत्सव आयोजित केला होता. महोत्सवाचा प्रारंभ माझा वेंगुर्लाच्यावतीने सागराला श्रीफळ अर्पण करुन व पतंग आकाशात सोडून करण्यात आला. यावेळी घेतलेल्या रस्सीखेच स्पर्धेत नवाबाग संघ विजयी ठरला. तालुक्यातील कलाकारांनी किनाºयावर रेखाटलेली वाळू शिल्पेही लक्षवेधी ठरली.