सिंधुदुर्ग : कोकिसरेत पुजाऱ्याचे माहेरवाशिनीशी गैरवर्तन, मंदिराला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 05:43 PM2018-05-26T17:43:17+5:302018-05-26T17:43:17+5:30
कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी आलेल्या माहेरवाशिनीशी पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे केली आहे.
वैभववाडी : कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी आलेल्या माहेरवाशिनीशी पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष जाधव यांच्याकडे केली आहे.
पुजाऱ्याने केलेल्या दृष्कृत्याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी चक्क ग्रामदेवतेच्या मंदिराला टाळे ठोकून पुजारी हटविण्याची मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार जाधव यांनी सोमवारी (२८) रोजी सुनावणी ठेवली असून ग्रामस्थ व पुजाऱ्याला नोटीस दिली आहे. तसेच ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे तातडीने काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
कोकिसरेचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवस्थानाचा वाद न्यायप्रवीष्ट असून काही वर्षे देवस्थान बंद होते. वर्षभरापूर्वी गावातील दोन्ही गटाच्या लोकांनी देवीच्या दैनंदिन पूजेसाठी दत्ताराम भिकू गुरव यांची नेमणूक केली होती. त्यामुळे गेले वर्षभर पुजाऱ्याकरवी देवीची दैनंदिन पूजाअर्चा व ग्रामस्थांचे मंदिरात जाणे-येणे सुरु आहे.
गावातील माहेरवाशीन देवीची ओटी भरण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात गेली होती. त्यावेळी पुजाऱ्याने तिच्याशी अश्लाद्य वर्तन केले, अशी लेखी तक्रार पिडीत माहेरवाशिनीच्या नातेवाईकांनी गावचे प्रमुख मानकरी अनंत मिराशी यांच्याकडे केली. त्यामुळे मिराशी यांच्या घरी ग्रामस्थांची बैठक झाली.
पुजाऱ्याने केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ मंदिराला टाळे ठोकून ग्रामस्थांनी पुजारी हटविण्याची मागणी केली आहे.
त्या बैठकीत पिडीतेच्या नातेवाईकांचा तक्रार अर्ज वाचण्यात आला. त्यावर चर्चा होऊन महालक्ष्मी मंदिरात नेमलेल्या पुजाऱ्याने केलेल्या गैरवर्तनामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील कुणालाही श्री महालक्ष्मी तसेच गावातील अन्य मंदिरात पूजा करण्यास बंदी घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाबाबत गुरुवारी मध्यरात्री पोलिसांना लेखी कल्पना देण्यात आली. बैठकीतील निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी सकाळी सुमारे शंभरहून अधिक ग्रामस्थ महालक्ष्मी मंदिराच्या आवारात जमले. त्यावेळी पोलीस उपस्थित होते.
ग्रामस्थांनी पोलिसांच्या उपस्थितीत महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून दरवाज्यावर निषेधाचा फलक लावण्यात आला आहे. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनंत मिराशी, प्रभाकर वळंजू, विश्वनाथ मेस्त्री, अनंत नेवरेकर, अभिजित मिराशी आदी उपस्थित होते.
सोमवारी सुनावणी
कोकिसरे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार सुनावणीसाठी तहसीलदार संतोष जाधव यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना नोटीस काढली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता हजर राहून आपले म्हणणे मांडावे.
आपण सुनावणीला हजर नसल्यास आपणास काही सांगायचे नाही, असे समजून निर्णय दिला जाईल, असे नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे तातडीने काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.